Skip to main content

Posts

Showing posts from 2006

माझी वाचनकथा

शशांकने खो दिल्यावर मी खरतर लगेचच पळायला पाहिजे होतं, पण आळस हा माणसाचा शत्रू आहे, शत्रूवरही प्रेम करा इत्यादी वाचलेल्या अनेक सुविचारांचा एकत्रित परिणाम झाल्याने आज मुहूर्त सापडला.. सर्वप्रथम ह्या सगळ्या प्रकाराबद्दल माझ्या मनात थोडी शंकाच आहे.. "तू जर ब्लॉग लिहितोस आणि स्वत:ला मराठी साहित्याचे उपासक समजतोस, तर मग सांग बघू काय काय वाचलय ते?" असं करणं म्हणजे "पोहता येत, तर मग जरा पाण्यात उडी मारून दाखव" ह्या धर्तीवर खिंडीत पकडणे होय. जर हा हेतू असेल तर मी तात्विक निषेध नोंदवतो आणि इथेच लिखाण थांबवतो, ;) ...अथवा पुढे वाचा (माफ करा पण आज्ञावल्या लिहून/वाचून if, else लिहायची सवय लागली आहे). वाचन हा सगळ्यात आवडता छंद. आणि लहानपणापासून मी हाती लागेल ते पुस्तक वाचायचो, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके दिवाळी अंक, कॉमिक्स, हे तर होतंच, पण सगळ्यात आवडीच्या पुस्तकांपैकी होती ती बालभारती, कुमारभारती. त्यांतले धडे फारच सुंदर होते, अर्थात परीक्षा नावाच्या एका राक्षसाने त्यातला आनंद अर्धा केला. संदर्भासह स्पष्टीकरण, कवितेचे रसग्रहण, भाषावैशिष्ट्ये असले प्रकार म्हणजे मला साहित्या

केल्याने देशाटन..

'केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार' असं मी लहानपणापासून ऐकतो आहे.. पण माझ्या व्यवसायात चतुर माणसांनाच देशाटनाची संधी मिळत असल्याने आधी कोंबडी की आधी अंडे अशी गत होऊन, मी दोन्ही गोष्टींना बरेच दिवस पारखा होतो. शेवटी सत्राशे साठ भानगडी करून मी ऑनसाइटची संधी साधली़च. प्रेमात, युद्धात आणि धंद्यात सारं काही क्षम्य ;).. तर अमेरिकेत आल्यावर सगळ्यात जास्त प्राधान्य अर्थात फिरण्याला होतं. जास्त फिरणं = जास्त चातुर्य सरळ हिशोब. फिरण्यातही मी अशी गावं निवडली की जिकडे माझे (माझ्यासारखेच) चतुर मित्र-मैत्रिणी तळ ठोकून होते. वसंतागमानापर्यंत न्यू-यॉर्क/कनेक्टिकट अशा जवळपासच्या मित्रांना मित्रप्रेम दाखवून झाल्यावर मी मिड वेस्ट कडे मोर्चा वळवला. मे च्या मेमोरिअल डे च्या सुट्टीत शिकागो - ब्लूमिंग्टन - इंडी असा धावता दौरा आखला. ब्लूमिंग्टनमधे शिल्पा-मोहित ने नवीन घर घेतलं होतं, त्याच्या वास्तुशांतीच आग्रहाचं आमंत्रण असूनही मी जावू शकलो नव्हतो, त्यामुळे ती पार्टी वसूल करणं हा एक अंतस्थ हेतू होताच. शिकागो विमानतळावर सचिन, शिल्पा आणि मोहित मला घ्यायला येणार ह्या विचाराने मी निर्धास्त होतो, पण

मुंबईचा फंडा..

काही काही गोष्टींच मुंबईशी अतूट नातं आहे. पाऊस हा त्यापैकीच एक. पावसाच्या धो धो कोसळण्याचं मुंबईला काही अप्रूप नाही. दर वर्षीच जून-जुलै-ऑगस्ट आणि कधीतरी सप्टेंबर मधेसुध्दा तो प्रंचंड कोसळतो. अर्ध्या मुंबईत पाणी भरतं. सगळ्या लोकल्स ठप्प होतात. दूरध्वनी/भ्रमणध्वनी बंद पडतात. शाळा लवकर सोडल्या जातात, लोकं ऑफीस मधून ३ वाजताच पळतात. आपल्या जवळच्या लोकांची थोडीशी काळजीही वाटू लागते. पण मग संध्याकाळी उशिरा घरी पोहचून पावसाने भिजलेले कपडे बदलून लोक आरामात चहाचे घुटके मारत टी व्ही वर पावसाने काय काय प्रताप केले ते बघत बसतात. जोडीला कांदा भजी आणि बाहेर वाजणारा पाऊस असं कॉम्बिनेशन असेल तर मग दिवसभराचा ताण कुठल्या कुठे पळून जातो. पण २६ जुलै २००५ चं पावसाचं कोसळणं काही वेगळंच होतं.. त्याचा वेग, आवेग, आवेश सारं काही अगदीच विलक्षण होतं. सारे विक्रम तोडून त्याने नवा इतिहास रचला. अर्थात वेधशाळेला त्याचा अंदाज कधीच लागत नाही, तो ह्यावेळीही लागण्याचा प्रश्नच नव्हता. पण फक्त एकच दिवस. एकच दिवस कोसळण्याचा होता आणि २७ जुलै परत मुंबईकरांचा होता. एका दिवसात मुंबई सारं मागे टाकून परत आपल्या कामाला लागली. मुंबई

तू सध्या काय करतो?

'एखादा पुढे काय करणार?', हा सगळ्यात अवघड प्रश्न असावा असं मला वाटत होतं, पण आजपर्यंतच्या अनुभवावरून 'एखादा सध्या काय करतो?' हा त्याहीपेक्षा अवघड प्रश्न आहे असं माझं मत बनलं आहे. सगळेच प्रश्न हे सोडवण्यासाठी नसतात, तर काही काही प्रश्न हे फक्त उत्तर देण्यासाठी असतात. "तू. स. का. क.?" हा एक तसला प्रश्न आहे. उत्तरण्यासाठी "तू.पु.का.क.?" हा फार सोपा आहे.. सहसा तो लहान मुलांना विचारला जातो. आणि मी डॉक्टर होणार, इंजिनिअर होणार, वकील होणार, शिक्षक होणार, सैन्यात जावून देशाची सेवा करणार ह्यापैकी काहीही सांगितलं की विचारणा-याचं (काका, काकी, मावशी, मामा, पाहुणे, मास्तर किंवा तत्सम) तात्काळ समाधान होऊन ते गप्प बसतात. पण "तू स. का. क.?" हे प्रकरण मात्र तेवढं सरळ नाही. कारण तुम्ही काहीही उत्तर दिलं तर 'म्हणजे नक्की काय' आणि 'का?' ह्या दोन्हींतला एक उपप्रश्न तुमच्या वाट्याला येतोच येतो.. ह्याची सुरुवात मी अभियांत्रिकीला प्रवेश घेतल्यावर झाली.. 'तू सध्या काय करतो?' असं एका परिचितांनी विचारल्यावर मी अभिमानाने म्हटलं, 'मी सांगलीला

मार्गे दलाल पथ...

पैसा पैशाला ओढतो, असं ऐकून एक गरीब माणूस मंदिरात गेला, हातातला एक रुपया दानपेटीवर धरून वाट बघू लागला, आपण २-३ रुपये ओढले तरी काही कमी फायदा नाही असा त्याचा हिशोब होता. पाच एक मिनिटांतच त्याच्या हातातून तो रुपया सुटला आणि दानपेटीत गेला.. ते पाहून तो उद्गारला, "अरेच्च्या! पैसा पैशाला ओढतो हे खरं आहे.. पण कोणाचा पैसा कोणाच्या पैशाला ओढेल हे मात्र सांगता नाही येणार" लहानपणी ऐकलेल्या ह्या गोष्टीचा अर्थ मला शेअर-बाजारात नव्याने समजला... मी माझा पैसा घेऊन दुस-यांचा पैसा ओढायला जायचो, आणि दुसरेच माझा पैसा ओढत. मग कोणीतरी म्हणालं, 'अरे वेड्या, असं नसतं कधी. पैसा म्युच्युअल फंड मद्धे टाकावा, सगळ्यांचा पैसा एकत्र येतो आणि मग win-win situation होते, सगळेच जण पैसा कमावतात.' Makes sense :D.. पैसा म्युच्युअल फंड मद्धे टाकला.. सगळयांचा पैसा एकत्र आला, पण दुर्दैवाने दुस-या MF ने फायदा कमवला, आमचा सगळ्यांचा पैसा त्यांनी ओढला, दुस-या MF वाल्या सगळ्यांनीच पैसा कमावला.. त्यांच्यासाठी खरच win-win situation झाली. Think Contra.. अशीही एक शेअर-बाजाराची Strategy आहे.. म्हणजे काय तर तुम्हाला एख

मुक्काम पोस्ट बोस्टन..

If you can not see the MARATHI text below, then please use following links Part I Part II काल दुपारी (नेहमीप्रमाणे) काम नसल्याने खिडकीतून बाहेर बघत होतो..आभाळ कसं अगदी भरून आलेलं आणि सोसाट्याचा वाराही सुट्लेला.. क्षणभर वाटलं की मस्तपैकी टपरीवर जावून कटिंग चहा मारावा.. अशा वातावरणात चहाची तल्लफ येण्यात चूक काहीच नाही.. फक्त त्यासाठी कुठेतरी भारतात असायला हवा होतो.. :( बघता बघता बोस्टनमधे येवून तीन महिने होत आले.. पण खरं पाहू जाता फार दूर आलोयं असं वाटतं नाही.. आणि तसं वाटण्यासारखी परिस्थिती पण नाही.. मागच्याच शनिवारी माझा एक मित्र कणकवलीहून आला, येताना माझ्या आईने दिलेले बेसनचे लाडू घेवून आला.. लगेचच मी घरी फोन करून ते मिळाले म्हणून कळवलं.. आणि आईने पण नेहमीप्रमाणे, 'कसे झालेत?, सगळ्या मित्रांना दे' असं सांगितलं.. जणू काही मी सांगलीत हॉस्टेलमधेच होतो.. आणि ह्या शनिवारी तर न्यू इंग्लड होळी पण साजरी झाली. पुण्यातून कूल कॅब ने मंदारकडे निघालो तेव्हा जरा धाकधूक होती, टॅक्सीवाला रात्री ११ वाजता मुंबईत पोहचल्यावर उगीचच इकडे तिकडे फिरवून जास्त भाडं तर नाही ना मागणारं?, पण दिवसा ढवळ्या