गणपती बाप्पा मोरया "हा रामेश्वर, म्हणजे शंकर, त्याचं मंदिर पूर्व-पश्चिम आहे. आणि हे विष्णूचं मंदिर माञ उत्तर-दक्षिण , म्हणजे त्याला आडवं आहे. इतकंच कशाला, विष्णू पण आडवा पहुडलेला आहे. हा काही योगायोग नाही. ह्या मागे पण पूर्वजांनी फार विचार केला आहे. भोळ्या शंकरावर तो लक्ष ठेवून आहे. एखाद्या राक्षसाने काही वर मिळवला, की त्याला आडवं जाण्याचं काम त्याला करावं लागतं.", देवळातले गुरव पुराणातल्या गोष्टीचा असा रंगतदार खुलासा करत होते, पण माझं लक्ष सृष्टीदेवतेकडेच होतं. गणपतीच्या दिवसांत तसंही अवघ कोकण हिरव्या रंगात माखून जातं आणि त्यात आकेरीच्या श्री रामेश्वर देवस्थानाचा परिसर तर खासच नटला होता. नजर जाईल तिकडे पसरलेले गुढघाभर उंचीचे भाताचे हिरवेकंच तरवे, त्यांतून अखंड वाहणाऱ्या वहाळाचा खळखळाट ह्यांनी डोळे आणि कान तृप्त होतच होते, पण नुकत्याच पडून गेलेल्या सरीनंतर हवेत मस्त गारवा आला होता आणि अंगाशी खेळणाऱ्या वाऱ्याच्या झुळकी त्याची मजा अजूनच वाढवत होत्या. सूर्यदे...