Skip to main content

वाकडच्या पाणी मोर्चाच्या निमित्ताने



कालचा (३ मार्च २०१८) पिंपरी - चिंचवड गृहनिर्माण सोसायट्यांच्या महासंघातर्फे आयोजित केलेला  मोर्चा हा खऱ्या अर्थाने वाकड मध्ये जागृती आणि चैतन्य निर्माण करणारा होता. 
ह्या वर्षी पाऊस चांगला पडला आणि अगदी ऑकटोबर / नोव्हेंबर पर्यंत होता. 
तरीही १ जानेवारी पासून अचानक पाणी पुरवठा अर्ध्यावर आला. 
वाकड मधल्या अनेक संस्थांना पाण्याची समस्या आहेच, पण ज्यांना पाणी येत होते त्यांनाही पाणी येणे बंद झाले.  
जर महानगर पालिकेच्या सबबींवर विश्वास ठेवायचा तर ३१ डिसेम्बर २०१७ रोजी एकतर सगळ्या पाईप लाईन्स आकुंचन पावल्या किंवा वाकड मध्ये २/३ लाख लोक एकदम एकाच दिवशी राहायला आले असा होतो. 
महापालिका प्रशासन लोकांना वेडं समजत असावं बहुतेक. पण लोकांनी रस्तयावर उतरून आम्ही ही चालूगिरी सहन करणार नाही हे दाखवून दिले. 



फेडरेशन चे देशमुख काका आपल्या भाषणात म्हणाले की हे IT वाले केशवसुतांना अभिप्रेत असलेले "लाडके " आहेत. दुर्दैवाने आज IT मध्ये ती परिस्थिती राहिली नाही :) . पण जमलेली लोकं लाडकी नसली तरी केशवसुतांचे "नवे शिपाई " नक्कीच होते. 
आणि ह्या "नव्या मनूच्या, नव्या दमाच्या शूर शिपायांना" एकत्र आणून त्यांच्यातील शक्तीचं रूपांतर विधायक चळवळीत करण्याचं सारं श्रेय्य हे फेडरेशनलाच जातं.  फेडरेशनच हे मोठं यश आहे आणि ते वाकड च्या प्रगती साठी फार मोलाचं आहे. 
त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार सुद्धा. 


खरं तर सकाळी घरातून निघताना मनात थोडी धाकधूक होती . मोर्चाला कमी लोकं तर नाही ना जमणार. पण सभेची गर्दी पाहून ती साफ पळून गेली. आपण आता "एकटे" नाही तर "एक" आहोत, ह्या चळवळीची शक्ती आपल्याबरोबर आहे हा हुरूप आला. 
खरंच फेडरेशनने फारच मोठं काम केले आहे. 
आता माघार नाही. 


सरफिरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है, देखना है पाणी कितना पाइपलाइन - ए - कोर्पोरेशन है 


Comments

Popular posts from this blog

मे महिना

शाळेत असताना माझा सगळ्यात आवडता महिना होता तो मे महिना! कारणं तर सगळ्यांनाच माहिती आहेत. निकाल लागलेला असल्याने पुढच्या वर्गात जाण्याची खात्री असायची, घरात सगळे नातेवाईक, पाहुणे असल्याने खेळायला/उनाडक्या करायला अख्खी टोळी असायची, त्यावेळी तरी पुढच्या वर्गांच्या शिकवण्या/संस्कार वर्ग/उन्हाळी शिबिरं असले काही प्रकार नव्हते आणि ह्या सगळ्याला असायची ती कोकणाची पार्श्वभूमी. आंबे, फणस, काजू, जांभळं, करवंद ह्यांचा रतीब, गाज ऐकत वेळेवर फिरणं, किल्ले बांधणं, शंख-शिंपले गोळा करणं, उकाड्याने हैराण झालो की एखादे काका/मामा आइस्क्रीम खायला देतील ह्या आशेवर राहणं, वळवाच्या पावसात चिंब होणं हे सगळं मनोसोक्त भोगायचे ते दिवस होते. इतक्या वर्षांनंतर परत मे महिन्यात कोकणात जायची संधी मिळाली. मारामारी करून कोड अप्रूव्ह करून घेतला आणि सरळ गोवा गाडी पकडून कणकवली गाठली. तसंही महिन्यातून एकदा जाणं होतंच, पण ते २, जास्तीत जास्त ३ दिवस. ह्या वेळी अख्खा आठवडा हातात होता. २ दिवस सिंधु-महोत्सव बघत आराम केला. कार्यक्रम/आयोजन चांगलं होतं पण मागच्याच आठवड्यात नाट्यमहोत्सवाची धमाल केलेल्या नाट्यवेड्या (नाट्यरसिक नव्हे)...

.... अवघे धरू सुपंथ

सकाळचे साडे नऊ , धडाम! ८५५५, निफ्टी खालच्या वाटोळ्याला (सर्किट) निपचित पडला. अपशकुनी १३ तारखेचा शुक्रवार वाकुल्या दाखवत होता. पोर्टफोलिओ बघण्याची ना हिम्मत नव्हती आणि ना उपयोग.  त्याहीपेक्षा भांडवली बाजाराच्या विरोधकांमधील सर्वकालीन अग्रणींपैकी एक असलेल्या सौभाग्यवतींना काय तोंड द्यायचं ह्याचा विचार करून मेंदूचा भुगा होता.धीर करून तिच्या भरवशाच्या सोन्याचा दर बघितले , ते पण पडलेले ... जरा हायसं वाटलं. निदान - "तरी मी सांगत होते , शेअर्स वर पैसे लावण्यापेक्षा सोनं घे" हे ऐकून घ्यावं लागणार नाही. करोना विषाणू लागण झालेली लोकं कमी आणि गुंतवणूकदार जास्त मारणार हे खरं ठरणार बहुतेक.  पण तसाही सगळीकडे अक्षरश: हाहाकार माजला आहे. २१ व्या शतकात शहरं विलगित केली जातात हा धक्का पचण्याआधीच प्रांताच्या विलगीकरणाची आणि त्या मागोमाग देशांच्या सीमा बंद झाल्याच्या बातम्या धडकल्या. अगदीच अकल्पित घडलं. गुंतवणूकदारांचं सोडाच, पण सगळे उद्योगधंदे ठप्प झाले आहेत.प्रवास, ...

तू सध्या काय करतो?

'एखादा पुढे काय करणार?', हा सगळ्यात अवघड प्रश्न असावा असं मला वाटत होतं, पण आजपर्यंतच्या अनुभवावरून 'एखादा सध्या काय करतो?' हा त्याहीपेक्षा अवघड प्रश्न आहे असं माझं मत बनलं आहे. सगळेच प्रश्न हे सोडवण्यासाठी नसतात, तर काही काही प्रश्न हे फक्त उत्तर देण्यासाठी असतात. "तू. स. का. क.?" हा एक तसला प्रश्न आहे. उत्तरण्यासाठी "तू.पु.का.क.?" हा फार सोपा आहे.. सहसा तो लहान मुलांना विचारला जातो. आणि मी डॉक्टर होणार, इंजिनिअर होणार, वकील होणार, शिक्षक होणार, सैन्यात जावून देशाची सेवा करणार ह्यापैकी काहीही सांगितलं की विचारणा-याचं (काका, काकी, मावशी, मामा, पाहुणे, मास्तर किंवा तत्सम) तात्काळ समाधान होऊन ते गप्प बसतात. पण "तू स. का. क.?" हे प्रकरण मात्र तेवढं सरळ नाही. कारण तुम्ही काहीही उत्तर दिलं तर 'म्हणजे नक्की काय' आणि 'का?' ह्या दोन्हींतला एक उपप्रश्न तुमच्या वाट्याला येतोच येतो.. ह्याची सुरुवात मी अभियांत्रिकीला प्रवेश घेतल्यावर झाली.. 'तू सध्या काय करतो?' असं एका परिचितांनी विचारल्यावर मी अभिमानाने म्हटलं, 'मी सांगलीला...