शशांकने खो दिल्यावर मी खरतर लगेचच पळायला पाहिजे होतं, पण आळस हा माणसाचा शत्रू आहे, शत्रूवरही प्रेम करा इत्यादी वाचलेल्या अनेक सुविचारांचा एकत्रित परिणाम झाल्याने आज मुहूर्त सापडला.. सर्वप्रथम ह्या सगळ्या प्रकाराबद्दल माझ्या मनात थोडी शंकाच आहे.. "तू जर ब्लॉग लिहितोस आणि स्वत:ला मराठी साहित्याचे उपासक समजतोस, तर मग सांग बघू काय काय वाचलय ते?" असं करणं म्हणजे "पोहता येत, तर मग जरा पाण्यात उडी मारून दाखव" ह्या धर्तीवर खिंडीत पकडणे होय. जर हा हेतू असेल तर मी तात्विक निषेध नोंदवतो आणि इथेच लिखाण थांबवतो, ;) ...अथवा पुढे वाचा (माफ करा पण आज्ञावल्या लिहून/वाचून if, else लिहायची सवय लागली आहे). वाचन हा सगळ्यात आवडता छंद. आणि लहानपणापासून मी हाती लागेल ते पुस्तक वाचायचो, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके दिवाळी अंक, कॉमिक्स, हे तर होतंच, पण सगळ्यात आवडीच्या पुस्तकांपैकी होती ती बालभारती, कुमारभारती. त्यांतले धडे फारच सुंदर होते, अर्थात परीक्षा नावाच्या एका राक्षसाने त्यातला आनंद अर्धा केला. संदर्भासह स्पष्टीकरण, कवितेचे रसग्रहण, भाषावैशिष्ट्ये असले प्रकार म्हणजे मला साहित्या...