Wednesday, February 06, 2008

जरा हे पण वाचा

जरा हे पण वाचा ..
http://shantashant.rediffiland.com/blogs/2008/02/07/The-Marathi-woes.html
जरी मराठीत नसला तरी मराठी माणसाबद्दल आहे.

Thursday, May 24, 2007

मे महिना

शाळेत असताना माझा सगळ्यात आवडता महिना होता तो मे महिना! कारणं तर सगळ्यांनाच माहिती आहेत. निकाल लागलेला असल्याने पुढच्या वर्गात जाण्याची खात्री असायची, घरात सगळे नातेवाईक, पाहुणे असल्याने खेळायला/उनाडक्या करायला अख्खी टोळी असायची, त्यावेळी तरी पुढच्या वर्गांच्या शिकवण्या/संस्कार वर्ग/उन्हाळी शिबिरं असले काही प्रकार नव्हते आणि ह्या सगळ्याला असायची ती कोकणाची पार्श्वभूमी. आंबे, फणस, काजू, जांभळं, करवंद ह्यांचा रतीब, गाज ऐकत वेळेवर फिरणं, किल्ले बांधणं, शंख-शिंपले गोळा करणं, उकाड्याने हैराण झालो की एखादे काका/मामा आइस्क्रीम खायला देतील ह्या आशेवर राहणं, वळवाच्या पावसात चिंब होणं हे सगळं मनोसोक्त भोगायचे ते दिवस होते.

इतक्या वर्षांनंतर परत मे महिन्यात कोकणात जायची संधी मिळाली.

मारामारी करून कोड अप्रूव्ह करून घेतला आणि सरळ गोवा गाडी पकडून कणकवली गाठली. तसंही महिन्यातून एकदा जाणं होतंच, पण ते २, जास्तीत जास्त ३ दिवस. ह्या वेळी अख्खा आठवडा हातात होता. २ दिवस सिंधु-महोत्सव बघत आराम केला. कार्यक्रम/आयोजन चांगलं होतं पण मागच्याच आठवड्यात नाट्यमहोत्सवाची धमाल केलेल्या नाट्यवेड्या (नाट्यरसिक नव्हे) कणकवलीकरांना त्याचं तेवढ कौतुक नव्हतं.बुधवारी सरळ बाईक काढली आणि जास्त काही विचार न करता कुणकेश्वरकडे निघालो.राणेसाहेबांच्या कृपेने रस्ता संपूर्ण डांबरी होता आणि बराही होता. ५०-६० चा वेग कायम ठेवून गाडी चालली होती. ह्या वेळी एकदम कोकणाच्या पोटात शिरायचं होतं, वाटाड्या म्हणून बाबा बरोबर होते. नोकरीनिमित्त त्यांनी सगळा जिल्हा पालथा घातला होता, त्यामुळे सगळा भुलभुलैय्या त्यांना ठावूक होता.

देवगड तालुक्यात शिरतानाच समोर येतो तो जिकडे तिकडे पसरलेला कातळ, किंबहुना अख्खा देवगड तालुका हा एकच कातळ आहे अधूनमधून थोडीफार माती असावी. ना त्याच्यावर धो धो कोसळणा-या पावसाचा परिणाम होतो, ना तो दात ओठ खावून आदळणा-या अरबी समुद्राला भीक घालतो, पण जगप्रसिद्ध देवगड हापूसच्या गोडीला कारणही हाच कठोर कातळ आहे बरं. म्हणूनच प्रचंड मेहनत घेवून लोकांनी इथे मोठमोठ्या बागा केल्या आहेत. कुणकेश्वरचा रस्ता सोडून मधेच आम्ही ४ किलोमीटर पुढे पोखरबांवला गेलो.इथे काही पांडवकालीन कुंडं आहेत आणि त्याच्या बाजूलाच शंकराचं, गणपतीचं मंदिर आहे. रखरखत्या उन्हातही कुंडात ब-यापैकी पाणी होतं. खाली उतरून गेलं की माणूस वेगळ्याच जगात पोचतो. अतिशय शांत आणि प्रसन्न वातावरण आणि कुंड/छॊटी गुहा ह्यांमुळे एक गारवा. आत्ता आत्ता मंदिराच बांधकाम चालू आहे. नाहीतर मागे ७-८ वर्षांपूर्वी गेलेलो तेव्हापर्यंत पांडवकालापासून काही बदल नव्हता ;).तिथून मग परत कुणकेश्वराचा रस्ता पकडला. डोंगरावरूनच निळ्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर, हिरव्या झाडीने वेढलेल्या
कुणकेश्वराचा पांढरा कळस दिसतो. आणि मग १-२ किलोमीटर घसरत गेलो की श्री क्षेत्र कुणकेश्वर आपलं स्वागत करतं. देवाचं दर्शन घेतलं, 'देवा माझं कल्याण (मराठी बरं का, तमिळ नव्हे ;) ) कर' अशी प्रार्थना केली आणि किना-यावर गेलो. स्वच्छ पांढरी शुभ्र वाळू आणि लाल/काळे खडक. लोकं देखील फार नव्हती. बहुतेक सगळे भक्तच होते, पर्यटक जास्त कोणी दिसले नाहीत. गर्दी होती ती माडांचीच आणि गोंगाट फक्त लाटा आणि वा-याचा.

हे गावही फार लहान आहे. झाडांनी वेढलेली छोटी/छोटी कौलारू घरं, लाल माती आणि वळणावळणाचा रस्ता, एकूण वळणच कोकणी. जेवणासाठी छोटी-छोटी हॉटेलं आहेत, राहण्यासाठी मात्र फार जास्त सोयी नाहीत. देवस्थानाचा एक भक्तनिवास आहे तिथे ७०-८० लोकं, आणि मंदिरापासून थोडं दूर सरकारी पर्यटक निवास आहे तिथे थोडी लोकं एवढ्यांचीच व्यवस्था आहे. अनेक लोकांचं हे मोठं श्रद्धास्थान आहे. महाशिवरात्रीला अफाट गर्दी असते. त्यावेळी मात्र गावकरी राहायची व्यवस्था करतात.


जवळच मीठमुंबरी आहे, तिथल्या किना-यावरून देवगडच्या (बंद) पवनचक्क्या दिसतात.मग समुद्राकाठचा रस्ता पकडून दक्षिण दिशा पकडली. पुढचा टप्पा होता मिठबांव. वडील बरेच वर्ष तिकडे होते. माझ्याही काही सुट्ट्या तिकडे गेल्या होत्या. मिठबांवचा किनारा पण असाच शांत आणि स्वच्छ होता. इथे कुठलातरी उद्योगसमूह पंचतारांकित हॉटेल टाकणार होता, पण मधेच त्याचे ग्रह-तारे कुठेतरी बिघडले. तसाही स्थानिक लोकांचा विरोध होताच. अहो एवढ्या लागणा-या आंबा, माडा-पोफळींच्या बागा टाकून विस्थापित होण्याची हौस कोणाला आहे? पण पिण्याच्या पाण्याची थोडीफार अडचण आहेच इकडे.

मस्त भूक लागली होती. गावात आलो आणि टपरीवजा हॉटेलात जेवणाची चौकशी केली तेव्हा कळालं की त्यांच्याकडे ५ दिवसांनी पाणी आलं होतं आणि पुढे कधी येईल ह्याची खात्री नव्हती. जेवणाचा बेत आपोआपच पुढे गेला.पूर्वी मिठबांव म्हणजे समुद्रात घुसलेलं टोक होतं, खाडीपलिकडे मालवण तालुका. हल्लीच त्या खाडीवर मस्त ऐसपैस पूल झाला आहे. त्यामुळे जवळजवळ १००(एकावर दोन शून्यं) किलोमीटरचं अंतर वाचवून आम्ही आच-याला निघालो. आच-याच्या रामेश्वरावरही खूप लोकांची श्रद्धा आहे, पण आधी पोटोबा, मग विठोबा ह्या न्यायाने अगोदर जेवून घेतलं मग देवळात गेलो. ह्या देवस्थानाचं वाचनालय १०० वर्षांपेक्षाही जुनं आहे.
आता जायच होतं ते आच-याच्या बंदरावर. आचरा बंदरावर
जायला मधल्या दलदलीत भर टाकून केलेला अर्धा एक किलोमीटरचा पूलासारखा रस्ता आहे. रस्ता तसा पूर्वीही होताच. पण आता तो मस्त रुंद केला आहे. मधे मधे छोट्या चौपाट्याही केल्या आहेत आणि एखादं घर रंगवावं, तसा रंगवला आहे.

आच-याच्या किना-यावर पूर्वी माझ्या एका मित्राचे तंबू होते. त्यावेळी माझ्या कॉलेजमधले मित्र, विक्रम आणि
अमितबरोबर मी आलो होतो, ते दिवसही फार मिस होतात :( . सध्या तरी तिथे सामसूमच होती.
समुद्राला मात्र उधाण आलं होत. थोडा वेळ शांत बसलो. समुद्राचं रूप चार इंद्रियानी मनोसोक्त अनुभवलं (चव सोडून. कोकणात बरेच संत, विभूती झाल्या, पण कोणी समुद्राचं पाणी गोड केलेलं नाही, मुंबईचे बाबा त्यामानाने पॉवरबाज आहेत ;) ) इकडे तिकडे फोटो काढले. समुद्रात गेलेल्या होड्या यायला अजून बराच वेळ होता. त्यामुळे ताजे मासे घरी नेण्यासाठी फार वेळ थांबावं लागलं असतं.
त्या भानगडीत न पडता आम्ही गडनदीच्या कडेकडेने जाणारा परतीचा रस्ता पकडला. पावसात हा रस्ता अगदी अप्रतिम असतो, पण मे महिन्यातही नदीत पाणी होतं आणि बराच हिरवेपणाही होता.


तासाभरात घरी पोचलो.
पण मन मात्र किना-यावरंच भटकत राहिलेलं....

Tuesday, July 18, 2006

माझी वाचनकथा

शशांकने खो दिल्यावर मी खरतर लगेचच पळायला पाहिजे होतं, पण आळस हा माणसाचा शत्रू आहे, शत्रूवरही प्रेम करा इत्यादी वाचलेल्या अनेक सुविचारांचा एकत्रित परिणाम झाल्याने आज मुहूर्त सापडला..

सर्वप्रथम ह्या सगळ्या प्रकाराबद्दल माझ्या मनात थोडी शंकाच आहे.. "तू जर ब्लॉग लिहितोस आणि स्वत:ला मराठी साहित्याचे उपासक समजतोस, तर मग सांग बघू काय काय वाचलय ते?" असं करणं म्हणजे "पोहता येत, तर मग जरा पाण्यात उडी मारून दाखव" ह्या धर्तीवर खिंडीत पकडणे होय. जर हा हेतू असेल तर मी तात्विक निषेध नोंदवतो आणि इथेच लिखाण थांबवतो, ;)
...अथवा पुढे वाचा
(माफ करा पण आज्ञावल्या लिहून/वाचून if, else लिहायची सवय लागली आहे).
वाचन हा सगळ्यात आवडता छंद. आणि लहानपणापासून मी हाती लागेल ते पुस्तक वाचायचो, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके दिवाळी अंक, कॉमिक्स, हे तर होतंच, पण सगळ्यात आवडीच्या पुस्तकांपैकी होती ती बालभारती, कुमारभारती. त्यांतले धडे फारच सुंदर होते, अर्थात परीक्षा नावाच्या एका राक्षसाने त्यातला आनंद अर्धा केला. संदर्भासह स्पष्टीकरण, कवितेचे रसग्रहण, भाषावैशिष्ट्ये असले प्रकार म्हणजे मला साहित्याची चिरफाड वाटे. नुसतंच वाचत जावं आणि त्यातच रमून जावं असं साधं सोपं आयुष्य असतं तर काय मजा आली असती! अनुभवाने सांगतोय, दहावीपर्यंत हे नशीब नव्हतं, पण अकरावी-बारावीत मराठी नव्हतं तरीही मी युवकभारती वाचून काढली, आणि त्या वाचनाचा आनंद अवर्णनीयच होता.
खर तर कुठल्याही वाचनाचा आनंद हा असाच असतो. ज्ञान मिळवण्यासाठीदेखील वाचावं लागतं, पण मग 'फक्त बर वाटतं' म्हणून जर एखादा वाचत असेल तर त्यातही काही चुकीचं नाही.
समीक्षक, परीक्षक लोकांची मला कधी कधी कींव येते, एवढं प्रचंड वाचन, पण त्यातून काही आनंद मिळतो की नाही देव जाणे.

तर मग फक्त बरं वाटावं म्हणून वाचत गेलो आणि पुस्तकांनी पण अगदी मन मोकळं केलं. काही पुस्तकांनी हसवलं, काहींनी रडवलं, काहींनी घाबरवलं, काहिंनी अस्वस्थ केलं, काहिंनी भडकवलं आणि काहिंनी बहकवलं.. आणि आजही कोणतही पुस्तक चांगलं की वाईट हे एकाच गोष्टीने ठरत- 'त्याने मनाला हात घातला का?'

तर आता थोडंफार त्या माझ्या प्रिय पुस्तकांबद्दल..

१. नुकतेच विकत घेतलेले पुस्तक (६ महिन्यांपूर्वी).
बहिणाबाईची गाणी

२. वाचले असल्यास, पुस्तकाबद्दल थोडेसे
:)

३. आवडलेली प्रभाव टाकणारी ५ पुस्तके.
कार्यरत - अनिल अवचट
गाडगेबाबा - गो. नि. दा.
समग्र पु. ल.
पार्टनर - व.पु.
दुर्दम्य - गंगाधर गाडगीळ
श्यामची आई, फास्टर फेणे, विज्ञान-राक्षस
आमचा पण गाव/एरंडाचे गु-हाळ - चि.वि. जोशी
घरभिंती

४. वाचायची आहेत अशी ५ पुस्तके..
बरीच आहेत .. पण नावं आठवत नाहीत.

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे.
कार्यरत ह्या अनिल अवचटांच्या पुस्तकात त्यांनी महाराष्ट्रात अतिशय साध्या, पण तितक्याच प्रभावी समाजकार्य करणा-या अनेक व्यक्त्तींबद्दल आणि त्यांच्या संस्था/चळवळी/उपक्रमांविषयी लिहिलेले आहे.


मी ह्यांना खो देतो आहे..
वसुद
विंचुरकरी
विवेक

Wednesday, May 31, 2006

केल्याने देशाटन..

'केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार' असं मी लहानपणापासून ऐकतो आहे..
पण माझ्या व्यवसायात चतुर माणसांनाच देशाटनाची संधी मिळत असल्याने आधी कोंबडी की आधी अंडे अशी गत होऊन, मी दोन्ही गोष्टींना बरेच दिवस पारखा होतो. शेवटी सत्राशे साठ भानगडी करून मी ऑनसाइटची संधी साधली़च. प्रेमात, युद्धात आणि धंद्यात सारं काही क्षम्य ;)..
तर अमेरिकेत आल्यावर सगळ्यात जास्त प्राधान्य अर्थात फिरण्याला होतं. जास्त फिरणं = जास्त चातुर्य सरळ हिशोब. फिरण्यातही मी अशी गावं निवडली की जिकडे माझे (माझ्यासारखेच) चतुर मित्र-मैत्रिणी तळ ठोकून होते. वसंतागमानापर्यंत न्यू-यॉर्क/कनेक्टिकट अशा जवळपासच्या मित्रांना मित्रप्रेम दाखवून झाल्यावर मी मिड वेस्ट कडे मोर्चा वळवला. मे च्या मेमोरिअल डे च्या सुट्टीत शिकागो - ब्लूमिंग्टन - इंडी असा धावता दौरा आखला. ब्लूमिंग्टनमधे शिल्पा-मोहित ने नवीन घर घेतलं होतं, त्याच्या वास्तुशांतीच आग्रहाचं आमंत्रण असूनही मी जावू शकलो नव्हतो, त्यामुळे ती पार्टी वसूल करणं हा एक अंतस्थ हेतू होताच.

शिकागो विमानतळावर सचिन, शिल्पा आणि मोहित मला घ्यायला येणार ह्या विचाराने मी निर्धास्त होतो, पण इलिनॉयमधे असले तरी मंडळी मूळची पुण्याची होती. पाहुण्यांना एवढ्या सहज यजमान भेटावेत हे पुणेकरांना मान्य नाहीच. "अरे आम्हाला पोहचायला उशीर होतो आहे, तर शिकागो ऐवजी मिलवाकी विमानतळावर ये आम्ही तिथे नक्की घ्यायला येतोय" सचिनने परत एक नवी योजना समजावून सांगितली. नशीब म्हणजे शिकागो विमानळावरून मिलवाकी विमानतळावर विमानाने नव्हे लोकल ट्रेन ने जायचं होतं. चला म्हणजे इथल्या सब-वेचाही फेरफटका होणार तर.

How to go to the sub way? असं मी तिथल्या एका म्हाता-या दुकानदार काकूंना नम्रपणे विचारलं .. माझ्यावर आपादमस्तक नजर टाकून त्या म्हणाल्या, "सीधा जाव, और पहला राइट लेलो, सामनेही प्लेटफार्म दिखेगा" आणि त्या परत ग्राहक कडे वळल्या.. ह्या गुजराथी मिश्रित हिंदी directions ने मी चमकलोच..अजून काही वर्षांनी गुजराथी अमेरिकेची द्वितीय/तृतीय भाषा झाली नाही तरच नवल.. ह्या धक्क्यातून सावरत मी स्टेशन गाठलं तर अजून एक अडचण समोर उभी. इथली सगळी तिकिट विक्री यंत्रांवर होती आणि ती सगळी यंत्रे "मुकाट्याने तिकिटाचे नेमके पैसे द्या, सुट्टे मिळणार नाहीत" असा वैधानिक इशारा अभिमानाने मिरवत होती. जगातले सगळे कंडक्टर, तिकिट विक्रेते आणि ही यंत्रे ह्यांच्यात कमालीची एकी आहे. अखेर मी क्रेडिट कार्ड घासून अख्ख्या दिवसाचा पास विकत घेतला, कारण एकेरी प्रवासासाठी आज रोख, उद्या उधार असा मामला होता. तरी एक बरं, अजून २-३ स्टेशनं माझ्या मित्रवर्यांनी मला पळापळ करायला लावली, तर पासाचे सगळे पैसे वसूल होतील ;).. पण सुदैवाने ती वेळ आली नाही. मिलवाकी च्या सब-वे स्टेशनवर सगळे हजर होते..
उशीर होण्यामागे कारण होतं की हे सगळे वाटेत एका दक्षिण-भारतीय देवळात थांबले होते आणि तिथून इड्ली-वडे-सांबार असले पदार्थ नाश्त्यासाठी खरेदी करून आले होते.. (हे सगळे पदार्थ त्या देवळात प्रसाद म्हणून फुकट वाटत असावेत अशी जोरदार शंका मला येत होती, पण to be on safer side, नाश्ता होइपर्यंत ती विचारायची नाही असं मी ठरवलं)..

शिकागो मधे हवामान फारच छान होतं, स्वच्छ ऊन पडलं होतं आणि पहिला मुक्काम होता तो नेव्ही पिअर. लेक मिशिगन च्या बाजूला बसून नाश्ता करायची शिल्पाची कल्पना सही होती. इतक्या वर्षांनी मित्रांच्या भेटी झाल्यावर इडली-सांबरही गोड लागत होतं, ते एवढं जास्त गोड का लागतंय असा विचार करत असताना लक्षात आलं की त्यात ती मिठाई मिसळली गेली होती.;) पण राव सचिन , शिल्पा आणि मोहितला भेटूनच माझं पोट भरल होतं, त्यामुळे खाण्यापिण्याची कोणाला काळजी?

नेव्ही पिअरच्या आजूबाजूला थोडा फार फेरफटका मारला आणि मग लेक मिशिगन / मिशिगन नदीतल्या फेरफटक्याला आम्ही निघालो. प्रथेप्रमाणे जिकडे वाटेल तिकडे फोटो काढणं मध्यंतरीच्य काळात चलूच होतं. शिकागो शहर मिशिगन नदीच्या काठावर वसलेलं आहे.. आणि शिकागो डाऊन-टाऊन संपूर्णपणे त्या नदीतून व्यवस्थित दिसतं. त्यामुळे नदीची सफर हा सगळ्या पर्य़टकांचा सगळ्यात आवडता कार्य़क्रम आहे. तोंडाचा चंबू करून मी एक एक इमारत बघत होतो. त्यांची शान ही जागतिक महासत्ता असणा-या अमेरिकेला साजेशीच होती. गगनचुंबी हे एकमेव साम्य, बाकी प्रत्येकीचा रंग-ढंग वेगळा. ह्या सा-या इमारतींनी जे कोलाज बनलेलं आहे, ते शब्दांत तर नाहीच पण कॅमे-यात टिपणं देखील अशक्य होतं. आपापले वास्तु-सौंदर्याचा भार सांभाळत, थोडासा नखरेलपणा करत त्या नदीच्या काठी तो-यात उभ्या होत्या.. अधून मधून नदीच्या पाण्यात प्रतिबिंब न्याहळत आपण आपल्या सखी-शेजारणी पेक्षा कांकणभर सरसच दिसतो आहोत ना ह्यांची त्या खात्री करत असाव्यात असं मला वाटून गेलं. एका तासाभराची ती सफर इतक्या महिन्यांनंतरही मनात अजून ठसलेली आहे.
पण गंमत म्हणजे, हे भव्य दिव्य शहर अमेरिकेची चोरांची आळंदी आहे. It's the No. 1 Crime city of USA.
आणि त्या काळ्या पैशाचा ह्या मोठ्या इमारती उभारण्यामागे फार मोठा हातभार आहे.

परत आल्यावर असांच टाइमपास करत डाऊन टाऊन मधे पायी पायीच मिलेनिअम पार्क कडे निघालो.. शिकागो मधे पर्यटकांसाठी फुकट बसेस आहेत. खरं तर आम्ही अशाच बस ने जायचा प्रयत्न केला होता, पण तो काही यशस्वी झाला नाही. मिलेनिअम पार्क देखील छान आहे आणि त्यात मुख्य आकर्षण आहे ते 'The Bean'. भली-मोठी चवळीच्या आकाराची ती स्टीलची वास्तुकृती अशा खुबीने ठेवली आहे की कुठूनही पाहिलं तरी त्यात अख्खं डाऊन टाऊन दिसतं. आणि त्या बीन ची संकल्पना - रचना एका अनिवासी भारतीयाचीच आहे..

त्यानंतर मग लेट लंच किंवा अर्ली डिनर करत आम्ही पोटाला काम आणि पायाला आराम दिला.. ताजंतवानं होवून मग परत शिकागो भ्रमंती सुरु झाली. वाटेत 'स्वामी विवेकानंद मार्ग' लागला, स्वामी विवेकानंदांनी जेथे त्यांचे सर्वधर्म-परिषदेतले ऐतिहासिक भाषण केले, त्या सभागृहाच्या समोरच्या रस्त्याला स्वामी विवेकानंदांचे नाव दिलेले आहे. अजून थोडं दमल्यावर चीझ-केक फॅक्टरीत पेस्ट्री खाणं झालं.. तसा खाण्या-पिण्याच्या बाबतीत मात्र माझा पाहुणचार अगदी व्यवस्थित चालू होता.

शिकागो मधे सगळ्यात मोठी इमारत आहे ती 'सिअर्स टॉवर' आणि त्या खालोखाल 'हॅनकॉक टॉवर'.हॅन्कॉक टॉवरवरून लेक मिशिगन आणि शिकागो बघायचं ठरलं, पण त्यांच्या ऑब्सर्व्हटरीवर जायला मोठीच रांग होती (आणि २०$ पण). मग त्या ऑब्सर्व्हटरीच्या खालच्या मजल्यावर (बहुतेक ९९ व्या) एक रेस्टॉरंट आहे. तिकडे कॉफी प्यायच्या बहाण्याने गेलो. त्या रेस्टॉरंट मधून झगमगणारं शिकागो आणि मॅगनिफिसन्ट माइल पाहिला. कॉफी न पिताच कलटी मारली. मला मनात थोडी धाकधूक होती, की त्यांचे द्वारपाल पकडून कॉफी घ्यायलाच लावतील. पण बाकी सगळे एकदम बिनधास्त होते. बहुतेक ही ट्रीक ब-याचदा वापरून चांगलेच सराइत झाले होते.तिथून मग पार्किंगमधून मोहितने गाडी काढली. आणि ब्लूमिंग्टनला निघालो. वाटेत कारंज्याजवळ थोडं थांबलो, पण त्याच्या रोषणाईची वेळ संपली होती. ह्या कारंज्यातूनही फार उंच उंच पाणी उडवतात, सकाळी ते बघितलं होतंच, पण रात्री त्याच्या वर रंगीत प्रकाशझोत मारल्यावर ते वेगळचं दिसतं.रात्री सचिनकडे मुक्काम केला. इतक्या वर्षांच्या साठलेल्या गप्पा मारता मारता पहाटे कधी तरी डोळा लागला.

सकाळी सगळं आवरून पियालीच्या घरी चहा-पाणी केलं. ब्लूमिंग्टन दर्शन १५ मिनिटात आटपून (गावच केवढसं) शिल्पा-मोहितच्या घरी जेवायला गेलो. पोटभर मासे आणि गप्पा झाल्या. पुणे-पटनीतली मजा आठवून सॉलीड हसलो. लोकांच्या पाठीमागे त्यांची निंदा करायची, सचिन व शिल्पाची (This is debatable, ते म्हणतील अमितची) हौस भागवली. :D .इथून पाय निघत नव्हता, पण सचिन मला १०० मैलांवर सोडणार होता आणि इंडियानावरून अमित आणि स्वप्ना मला न्यायला येणार होते.

Friday, May 19, 2006

मुंबईचा फंडा..

काही काही गोष्टींच मुंबईशी अतूट नातं आहे. पाऊस हा त्यापैकीच एक.
पावसाच्या धो धो कोसळण्याचं मुंबईला काही अप्रूप नाही. दर वर्षीच जून-जुलै-ऑगस्ट आणि कधीतरी सप्टेंबर मधेसुध्दा तो प्रंचंड कोसळतो. अर्ध्या मुंबईत पाणी भरतं. सगळ्या लोकल्स ठप्प होतात. दूरध्वनी/भ्रमणध्वनी बंद पडतात. शाळा लवकर सोडल्या जातात, लोकं ऑफीस मधून ३ वाजताच पळतात. आपल्या जवळच्या लोकांची थोडीशी काळजीही वाटू लागते. पण मग संध्याकाळी उशिरा घरी पोहचून पावसाने भिजलेले कपडे बदलून लोक आरामात चहाचे घुटके मारत टी व्ही वर पावसाने काय काय प्रताप केले ते बघत बसतात. जोडीला कांदा भजी आणि बाहेर वाजणारा पाऊस असं कॉम्बिनेशन असेल तर मग दिवसभराचा ताण कुठल्या कुठे पळून जातो.
पण २६ जुलै २००५ चं पावसाचं कोसळणं काही वेगळंच होतं.. त्याचा वेग, आवेग, आवेश सारं काही अगदीच विलक्षण होतं. सारे विक्रम तोडून त्याने नवा इतिहास रचला. अर्थात वेधशाळेला त्याचा अंदाज कधीच लागत नाही, तो ह्यावेळीही लागण्याचा प्रश्नच नव्हता.
पण फक्त एकच दिवस. एकच दिवस कोसळण्याचा होता आणि २७ जुलै परत मुंबईकरांचा होता. एका दिवसात मुंबई सारं मागे टाकून परत आपल्या कामाला लागली.

मुंबईचा पावसासारखाच अविभाज्य भाग जर कोण असेल तर तो म्हणजे शेअर बाजार. पावसाएवढाच बेभरवशी. पावसाचं भाकीत जसं कोणी करू शकत नाही, तसंच आज सेन्सेक्स कुठे बंद होईल हेही कोणी कधी सांगू शकत नाही. सारे मोसमी वारे, कमी दाबाचे/जास्त दाबाचे पट्टे/तापमान उपग्रहाने पाठवलेली छायाचित्रे ह्यांच बरोबर विश्लेषण करूनही शेवटी हवामानाचा अंदाज चुकतो, तसाच कंपन्यांचे ताळेबंद, चलनवाढ, व्याजदर, कच्च्या तेलाचे दर, हे सगळं विचारत घेवून काढलेलं ऍनॅलिसिस ही चुकतच...

आणि काल तो ही कोसळला.
नुसताच कोसळला नाही, तर आडवा-उभा कोसळला. त्याने ना रिलायन्सला सोडलं, ना इन्फोसिसला, ना एल ऍन्ड टी ला. Correction की Corrision असं वाटण्याची वेळ आली.
पण गुंतवणूकदारांना हे कोसळणं नाही घाबरवू शकत. उलट जवळपास सा-यांना राहून राहून एकाच गोष्टीच वाईट वाटत होतं - सगळेच शेअर्स एवढे स्वस्त झालेत, पण हातात जास्त कॅश नाही. :-( ! ज्यांच्याकडे १०,००० होते त्यांना पण आणि ज्यांच्याकडे १,०००,००० होते त्यांना पण.
२ सोमवार काळे उजाडलेले म्हणून काय झालं? एक सोमवार तर चांगलाच उजाडेल.
निदान मला तरी वाटतंय ह्याही कोसळण्याला मागे टाकून परत बाजार वर जाईल. १८-१९ मे ची भरपाई २२ मे ला होईल.

फंडामेंटली तरी काहीच बदललेलं नाही..
अर्थव्यवस्थेचे फंडामेंटल्स तर तेवढेच भक्कम आहेत.

...आणि कोसळण्याला न घाबरणं हाही एक मुंबईचा फंडा आहेच. :)

Saturday, April 15, 2006

तू सध्या काय करतो?

'एखादा पुढे काय करणार?', हा सगळ्यात अवघड प्रश्न असावा असं मला वाटत होतं, पण आजपर्यंतच्या अनुभवावरून 'एखादा सध्या काय करतो?' हा त्याहीपेक्षा अवघड प्रश्न आहे असं माझं मत बनलं आहे. सगळेच प्रश्न हे सोडवण्यासाठी नसतात, तर काही काही प्रश्न हे फक्त उत्तर देण्यासाठी असतात. "तू. स. का. क.?" हा एक तसला प्रश्न आहे. उत्तरण्यासाठी "तू.पु.का.क.?" हा फार सोपा आहे.. सहसा तो लहान मुलांना विचारला जातो. आणि मी डॉक्टर होणार, इंजिनिअर होणार, वकील होणार, शिक्षक होणार, सैन्यात जावून देशाची सेवा करणार ह्यापैकी काहीही सांगितलं की विचारणा-याचं (काका, काकी, मावशी, मामा, पाहुणे, मास्तर किंवा तत्सम) तात्काळ समाधान होऊन ते गप्प बसतात. पण "तू स. का. क.?" हे प्रकरण मात्र तेवढं सरळ नाही. कारण तुम्ही काहीही उत्तर दिलं तर 'म्हणजे नक्की काय' आणि 'का?' ह्या दोन्हींतला एक उपप्रश्न तुमच्या वाट्याला येतोच येतो..

ह्याची सुरुवात मी अभियांत्रिकीला प्रवेश घेतल्यावर झाली..
'तू सध्या काय करतो?' असं एका परिचितांनी विचारल्यावर मी अभिमानाने म्हटलं, 'मी सांगलीला Govt College मधे Computer Engineering शिकतो.' आश्चर्याचा झटका बसून ते म्हणाले, 'अरे आपल्या सावंतवाडीस आपटेक (Aptec) असताना तू सांगलीत कशाला रे गेला? त्यातून ते सरकारी कॉलेज, सांगलीबाहेर कोणाला माहिती तरी असेल का? आपटेक म्हणजे कशी जगप्रसिध्द संस्था'.. त्यांच्या कोणी भाच्याने नुकताच कसल्या तरी ६ महिन्याच्या कोर्सला सावंतवाडीतल्या जगप्रसिध्द आपटेक मधे प्रवेश घेतला होता आणि तोही कॉम्पुटरच शिकत होता, त्यामुळे मी शहरात जावून मजा करता यावी यासाठी सांगलीला गेलो असं त्यांना वाटलं, माझ्या वडिलांना त्यांनी तसं बोलूनही दाखवलं.. पण ६ महिन्यात जर कॉम्पुटर शिकता येतो तर मी ४ वर्ष काय करणार ह्याचा उलगडा मात्र त्यांना शेवटपर्यंत झाला नाही.

असंच एकदा आणखी एका काकांनी विचारलं, 'कॉम्प्युटर शिकतं? मगे तुमका कॉम्प्युटर बांधूक शिकवतत मां? राण्यांचो बाबलो, तेना पण कॉम्प्युटरचो क्लास केल्यान. आता फस्सक्लास कॉम्प्युटर बांधता, कलर!' Assembling a Computer ह्याला 'कॉम्प्युटर बांधणे' ह्या सारखा अस्सल देशी शब्द फक्त कोकणातच सापडेल. माझ्या दुर्दैवाने आमच्या अभ्यासक्रमात ते नव्हतं. त्यामुळे मी कलर तर काय ब्लॅक ऍन्ड व्हाइट पण कॉम्प्युटर बांधू शकत नव्हतो. एवढी फी भरून पण कामाचं काहीही न शिकवणारं आमचं महाविद्यालय म्हणजे फार ४२० आहे. अशा कॉलेजच्या तावडीत मी सापडल्या बद्दल त्यांनी थोडी-फार सहानुभूतीही दाखवली, कॉलेजमधे कॉम्प्युटर आहे तर किमान टायपिंग शिकून घे असाही सल्ला जाता जाता दिला.

आमच्या अभ्यासात नसलेला दुसरा एक प्रकार म्हणजे Windows. Software बद्दल थोडी-फार (किंवा फार थोडी) माहिती असलेल्या एका साहेबांनी मला अभ्यासक्रम परत एकदा नीट' बघ असं सांगितलं, आणि तरीही Windows खरंच नसेल तर बाहेर एखाद्या जगप्रसिध्द संस्थेत windows आणि word चा क्लास लाव असंही सांगितलं..

मी आई-बाबांनाही एकदा माझा अभ्यासक्रम समजवायचा प्रयत्न केला. पण त्यांना काही समजलं तर नाहीच, पण पुढे नोकरी व्यवस्थित मिळेल का याची त्यांना काळजी वाटू लागली.
सुदैवाने campus मधे बरी नोकरी लागली आणि जरा शांतता लागेल असं वाटू लागलं. पण हा आनंदही जास्त दिवस टिकला नाही.
'तुमच्या कंपनीत माल काय बनतो?' इति माझा एक दहावीनंतर स्वत:चा धंदा सांभाळणारा माझा मित्र. 'मी तिथे प्रोग्रॅम लिहितो' मला काय उत्तर द्यावं ते समजलंच नाही. 'तसं नाही रे, आयटम काय बनवता तुम्ही?' आमच्या ह्या संभाषणाच्या अखेरीस मी काही तरी लिहितो, ते CD वर write होतं आणि ती CD आम्ही गि-हाइकांना विकतो, म्हणजे आमचा CD बनवून विकायचा धंदा आहे असा अर्थ त्याने काढला. तू कॉम्प्युटर कंपनी मधे काम करतोस, मग आम्हाला एखादा कॉम्प्युटर स्वस्तात काढून दे असं तर मला कमीत कमी १० जणांनी तरी सांगितलं असेल.

जसं जसं मी शहरातल्या लोकांच्या संपर्कात आलो, तसा प्रश्न अधिकच अवघड (किंवा बोचरा) होऊ लागला. 'तू खरच सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेस? मग अजून बाहेर कसा नाही गेलास? आमच्या साहेबांचा (किंवा सासरेबुवांचा/मित्राचा/ह्यांचा) पुतण्या एवढा हुशार की त्याला कंपनीने बाहेर पाठवला'... म्हणजे मी हुशार नाही? 'तसं आजकाल कोणीही जातं म्हणा, तू पण जाशील'... ह्याला सांत्वन म्हणायच का? बरं बाहेर म्हणजे नुसती अमेरिका!.. इतर कोणत्याही ठिकाणी जाणं एवढं महत्त्वाचं नाही.. एखादा स्वीडन/जपानला जावून आला, तरीही ह्या असल्या लोकांच्या दृष्टीने त्याला काही फार अर्थ नाही.

त्यात माझं कार्यक्षेत्रं (domain) थोडंस वेगळं. PDM/PLM. हे नक्की काय ते बाकीच्या संगणकीय बांधवांना पण स्पष्ट करून सांगण थोडं अवघड पडतं. मग 'तू CAD वापरायला येत नाही, तर मग Manufacturing संबंधित कंपनीत कसं काम करतोस?' 'तू कॉम्प्युटर इंजिनिअर असूनही automobile साठी काम करतोस?', 'त्यापेक्षा (हा एक फार वाईट शब्द) तू Fianance मधे का नाही try करत?' असे प्रश्न पिच्छा पुरवतात.

आमच्या एका विक्री-प्रतिनिधी ने मला अलिकडेच माझ्या प्रोजेक्टबद्दल सोप्या भाषेत सांगायला सांगितलं..त्याला कुठे तरी presentation द्यायचं होतं. मग मी ही अगदी प्रामाणिकपणाने सांगितलं.. ''we are implementing a system for a textile company. This system holds verious data like, कापडांचे प्रकार, स्टाइल्स, डिझाइन्स, रंग, कापड रंगवण्याच्या पध्द्ती, सप्लायर्स, कारखाने इ. इ.. शिवाय ही प्रणाली प्रत्येक पोषाखाच्या निर्मिती मधल्या प्रत्येक टप्प्यावर निर्माण होणारी माहिती पण साठवू शकते.." असं मी त्याला बरंच सोपं करून सांगितलं. सगळं ऐकून घेतल्यावर तो म्हणाला,' वा! चांगली माहिती दिलीस. presentationla फार उपयोग होईल. पण मला एक कळलं नाही हे एवढं सगळ system करते तर तू काय करतोस?'.. अरे बाबा मी ही system develope/implement करतो.. आता मी त्या कपड्यांच्या कारखान्यात बसून कपडे शिवावेत अशी ह्याची अपेक्षा होती का?

खरं तर तुम्ही नक्की काय करता हे समजल्याने लोकांना काहीही फरक पडत नाही.. त्यामुळे त्यांना खरं काही सांगायच्या प्रयत्नात स्वत:चा छळ करून घेवू नये अशा निष्कर्षाला मी आलो आहे. सगळ्यात सुरक्षित मार्ग म्हणजे प्रत्येकी ४-५ अवघड इंग्रजी शब्द (वेळ-काळ पाहून अवघड शब्द निवडा, एखाद्याला नुसतेच इंग्रजी शब्द अवघड जातात, तर एखादा GRE वाला असेल, तर स्वत:ला नक्की अर्थ महिती असलेले शब्द वापरा) किंवा विशिष्ट पारिभाषिक शब्द असलेली ४ वाक्य फेकणे, आणि 'म्हणजे काय' असं कोणी विचारलं, तर 'ते जरा अवघड आहे (तुझ्यासारख्याला नाही कळणार - हा मतितार्थ ;)), तुला कधी XYZ ऐकलं आहेस का? हे थोड-फार त्याच्यासारख आहे, पण PQR म्हणून पण वापरता येतं'
हे XYZ आणि PQR आधीच्या वाक्यांपेक्षा अवघड असले म्हणजे झालं :D..

एकूण काय तर, 'तू सध्या काय करतो?' ह्या प्रश्नाच उत्तर, 'लोकांना मी काय करतो ते सांगायचा प्रयत्न करतो' असं देण्याची वेळ येऊ नये ही काळजी घ्या..

Monday, April 10, 2006

मार्गे दलाल पथ...

पैसा पैशाला ओढतो, असं ऐकून एक गरीब माणूस मंदिरात गेला, हातातला एक रुपया दानपेटीवर धरून वाट बघू लागला, आपण २-३ रुपये ओढले तरी काही कमी फायदा नाही असा त्याचा हिशोब होता. पाच एक मिनिटांतच त्याच्या हातातून तो रुपया सुटला आणि दानपेटीत गेला.. ते पाहून तो उद्गारला, "अरेच्च्या! पैसा पैशाला ओढतो हे खरं आहे.. पण कोणाचा पैसा कोणाच्या पैशाला ओढेल हे मात्र सांगता नाही येणार"

लहानपणी ऐकलेल्या ह्या गोष्टीचा अर्थ मला शेअर-बाजारात नव्याने समजला... मी माझा पैसा घेऊन दुस-यांचा पैसा ओढायला जायचो, आणि दुसरेच माझा पैसा ओढत. मग कोणीतरी म्हणालं, 'अरे वेड्या, असं नसतं कधी. पैसा म्युच्युअल फंड मद्धे टाकावा, सगळ्यांचा पैसा एकत्र येतो आणि मग win-win situation होते, सगळेच जण पैसा कमावतात.' Makes sense :D.. पैसा म्युच्युअल फंड मद्धे टाकला.. सगळयांचा पैसा एकत्र आला, पण दुर्दैवाने दुस-या MF ने फायदा कमवला, आमचा सगळ्यांचा पैसा त्यांनी ओढला, दुस-या MF वाल्या सगळ्यांनीच पैसा कमावला.. त्यांच्यासाठी खरच win-win situation झाली.

Think Contra.. अशीही एक शेअर-बाजाराची Strategy आहे.. म्हणजे काय तर तुम्हाला एखादा शेअर घ्यायचा असेल तर तुम्ही ते चार लोकांना बोलून दाखवा, जर त्यांनी तुम्हाला वेड्यात काढंल, की तुम्ही फार फायद्याचा निर्णय घेतला आहे अशी खात्री बाळगा.. अहो दूरदृष्टी ही प्रत्येकाकडे नसते (आपणही अपवाद नाही), त्यामुळे बहुतांशी लोकांना तो शेअर वाईट वाटला, म्हणजे तो नक्कीच चांगला असतो.. असा काहिसा त्याचा अर्थ आहे.. मी थोडीफार गुंतवणूक ही Strategy वापरून केली.. लोकांकडे दूरदृष्टी नाही हे पण निष्पन्न झालं, त्यांनी जे शेअर्स वाईट म्हटले होते, ते प्रत्यक्षात प्रचंड वाईट निघाले.

अर्थात, प्रत्येकवेळी तुमचा निर्णय चुकतो असं काही नाही, अमुक एका शेअर बद्दल तुम्हाला बरोबर अंदाज येतो..(तो बरोबर होता हे नंतर कळतं) पण नेमकी त्याचवेळी icicidirect.com (किंवा indiabulls.com) प्रचंड थकलेली असते.. असेही बरेच सौदे हातातून सुटतात..

मग माणसाने करावं तरी काय? एकाने गुरुमंत्र दिला की एका विशिष्ट क्षेत्रावर केन्द्रित राहा. साखर, पायाभूत सुविधा, खनिज तेल, पोलाद, साबण, संगणक, अभियांत्रिकी इ. इ. पण फार केन्द्रित रहावं लागतं बरं का!
झालं. अगदी मनापासून मी हा उपदेश पाळायचा ठरवलं आणि जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी मला माझा पोर्टफोलिओ दिसू लागला. लिटरमागे पेट्रोल ३ आणि डिझेल २ रुपयांनी महागणार ही बातमी वाचून माझा आनंद गगनात मावेना.. कालच तर मी ONGC खरेदी केला होता. IDFC चे शेअर्स माझ्या DMAT Act. मद्धे आल्या आल्या मी Express-Highway war ४ फे-या अशाच मारल्या, Toll Collection वाढेल तर बोनस शेअर्स मिळतील.. You don't get rich by saving money, you get rich by spending it, असं कोणीतरी म्हटलंच आहे. इन्फोसिसच्या कर्मचा-यांना सरासरी २०% पगारवाढ मिळाल्याचे ऐकून माझा जीव हळहळला, अहो प्रॉफिट मार्जिन नाही का कमी होणार? त्यापेक्षा Patni/TCS चांगल्या आहेत.
बलरामपूर चिनी मात्र जरा महागात पडली. शेअर वाढला, तरी जास्त साखर खाल्ल्याने डॉक्टरकडे जावं लागलं आणि त्याने ढीगभर औषधं लिहून दिली.. औषधांची यादी वाचताच माझी ट्युब पेटली- च्यायला सगळा पैसा डॉक्टरसाहेब रणबक्षी मद्धे लावतात तर..

पण हा तोडगा मात्र लागू पडला.. थोडा फार नफा मिळू लागला. मग 'विखुरलेली गुंतवणूक' असा धोका कमी करण्याचा मार्ग माझ्या वाचनात आला. पण मग सगळे पैसे आधीच अडकलेले होते. शेवटी मनावर दगड ठेवून २ चांगले शेअर्स विकले आणि २ खराब शेअर्स खरेदी केले. काहीही झालं तरी संतुलित पोर्टफोलिओ असणं जास्त महत्त्वाचं नाही का?

अशा रीतीने सध्या ब-यापैकी गुंतवणूक आणि थोडाफार गुंता झालेला आहे.. पण परिस्थिती आशादायक आहे. कोण म्हणतं मराठी माणूस शेअर बाजारात यशस्वी होऊ शकत नाही? :D

आता पुढची पायरी.. वायदे बाजार.. तिथे तर बिकट वाट वहिवाट आहे.. पण आपल्या शुभेच्छ्या गृहित धरतोय.
तिथले अनुभव परत कधी तरी..