सकाळचे साडे नऊ , धडाम! ८५५५, निफ्टी खालच्या वाटोळ्याला (सर्किट) निपचित पडला. अपशकुनी १३ तारखेचा शुक्रवार वाकुल्या दाखवत होता. पोर्टफोलिओ बघण्याची ना हिम्मत नव्हती आणि ना उपयोग. त्याहीपेक्षा भांडवली बाजाराच्या विरोधकांमधील सर्वकालीन अग्रणींपैकी एक असलेल्या सौभाग्यवतींना काय तोंड द्यायचं ह्याचा विचार करून मेंदूचा भुगा होता.धीर करून तिच्या भरवशाच्या सोन्याचा दर बघितले , ते पण पडलेले ... जरा हायसं वाटलं. निदान - "तरी मी सांगत होते , शेअर्स वर पैसे लावण्यापेक्षा सोनं घे" हे ऐकून घ्यावं लागणार नाही. करोना विषाणू लागण झालेली लोकं कमी आणि गुंतवणूकदार जास्त मारणार हे खरं ठरणार बहुतेक. पण तसाही सगळीकडे अक्षरश: हाहाकार माजला आहे. २१ व्या शतकात शहरं विलगित केली जातात हा धक्का पचण्याआधीच प्रांताच्या विलगीकरणाची आणि त्या मागोमाग देशांच्या सीमा बंद झाल्याच्या बातम्या धडकल्या. अगदीच अकल्पित घडलं. गुंतवणूकदारांचं सोडाच, पण सगळे उद्योगधंदे ठप्प झाले आहेत.प्रवास, ...