सकाळचे साडे नऊ , धडाम! ८५५५, निफ्टी खालच्या वाटोळ्याला (सर्किट) निपचित पडला. अपशकुनी १३ तारखेचा शुक्रवार वाकुल्या दाखवत होता. पोर्टफोलिओ बघण्याची ना हिम्मत नव्हती आणि ना उपयोग. त्याहीपेक्षा भांडवली बाजाराच्या विरोधकांमधील सर्वकालीन अग्रणींपैकी एक असलेल्या सौभाग्यवतींना काय तोंड द्यायचं ह्याचा विचार करून मेंदूचा भुगा होता.धीर करून तिच्या भरवशाच्या सोन्याचा दर बघितले , ते पण पडलेले ... जरा हायसं वाटलं. निदान - "तरी मी सांगत होते , शेअर्स वर पैसे लावण्यापेक्षा सोनं घे" हे ऐकून घ्यावं लागणार नाही.
करोना विषाणू लागण झालेली लोकं कमी आणि गुंतवणूकदार जास्त मारणार हे खरं ठरणार बहुतेक.
पण तसाही सगळीकडे अक्षरश: हाहाकार माजला आहे. २१ व्या शतकात शहरं विलगित केली जातात हा धक्का पचण्याआधीच प्रांताच्या विलगीकरणाची आणि त्या मागोमाग देशांच्या सीमा बंद झाल्याच्या बातम्या धडकल्या. अगदीच अकल्पित घडलं. गुंतवणूकदारांचं सोडाच, पण सगळे उद्योगधंदे ठप्प झाले आहेत.प्रवास, बाजारपेठा, चित्रपटगृहे, शाळा, महाविद्यालये ह्यांच्या बंदीमुळे आर्थिक चक्र थांबलं आहे. ऑलम्पिक सुद्धा रद्द करण्याची पाळी आली आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडून पडायच्या मार्गावर आहेत.
४ महिने झाले तरी ह्या रोगाचा संसर्ग थांबवण्याचा काही उपाय सापडत नाही आहे. विषाणु नाहीसा करेल असं औषधही सापडत नाही आहे. प्रतिबंधक लस बनविणे दूरच राहिलं , ह्याचा उगम कसा झाला हे कोडंही उलगडलं नाही आहे. हा निसर्गाचा कोप आहे, की कोणतं जैविक अस्त्र, का कोणाचा फसलेला प्रयोग? ह्यातून सुटका होणार का? आणि झाली तरी कधी होणार? का कधीच होणार नाही? इतकी सगळी वैज्ञानिक प्रगती केली, ती सारी निरर्थकच का? माणूस एवढा हतबल क्वचितच झाला असेल.
पण सारंच काही निराशादायक नाही. सर्वात आधी स्वत:चा जीव धोक्यात घालून करोनाग्रस्तांवर अहोरात्र उपचार करणारे वैद्यकीय क्षेत्रातील लोकं ! त्यांचा सेवाभाव, त्याग आणि रुग्णसेवेप्रती बांधिलकी सारं काही दीपवून टाकणारं आहे. तसेच रोगराई पसरू नये म्हणून आमच्यासारखाय बेजबाबदार लोकांनी केलेला कचरा युद्धपातळीवर हटवणारे सफाई कर्मचारी ह्यांच्यासाठी ही नकळत हात जोडून जातात. त्यांच्या कामामुळे इतरांनाही नवी उमेद आणि भरवसा मिळतो आहे. जगभरातल्या सामाजिक संस्थांनी अनेक चांगल्या सवयीचा केलेला पाठपुरावा , सर्वांमध्ये केलेली जागृती आणि लोकांनी त्याला दिलेला प्रतिसाद तर विलक्षण आहे. ह्या अथक प्रयत्नांमुळेच रोगातून ठणठणीत बरे होण्याचे प्रमाणही खूप जास्त आहे. आणि हीच माझ्यादृष्टीने सर्वात मोठी आशा आहे.
निसर्गाच्या अनेक वरदानांपैकी एक म्हणजे सामुदायिक प्रतिकारशक्ती (Community Immunity / Herd Immunity - https://en.wikipedia.org/wiki/Herd_immunity ). रोगांतून बरे होताना सजीवांचे शरीर रोगांविरुद्ध एकप्रकारची प्रतिकारशक्ती तयार करतात. ही प्रतिकारशक्तीची उत्क्रांती बऱ्या झालेल्या लोकांपर्यंतच मर्यादित न राहता इतर लोकांमध्येही पसरते. जेवढे जास्त लोक रोगाची लागण होऊन बरे होतील, तेवढी प्रतिकारक्षमता त्या प्रजातीमध्ये अधिक बळकट होते. आणि अखेर तो रोग निष्प्रभ ठरतो. काही वेळा कालांतराने अशा रोगांचा मागमूसही राहत नाही. आणि हया करोना विषाणूच्या बाबतीतही असंच काहीतरी होईल अशी मला आशा आहे.
खरं म्हणजे ही शिकवण तर आपल्याला आधीच मिळालेली आहे . एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ ! पण क्षुल्लक गोष्टींच्या मागे धावताना महत्त्वाच्या गोष्टी विसरून जाण्याचा बेजबाबदारपणाही आपल्या अंगात भिनलेला आहे. मग आपणाला वठणीवर आणण्यासाठी निसर्गदेवता अशा लीला तर दाखवत नाही ना?
माझ्या मते ह्यातून अजूनही अनेक काही शिकण्यासारखे आहे. मरणाच्या दारात जाऊन आल्यावरच आयुष्याचे खरे मोल कळते. जर जग अशा एखाद्या विषाणूने नष्ट होऊ शकते, तर मीपणा कसला बाळगायचा? ह्या खोट्या गोष्टींसाठी लोकं कादुरावयाची? पैसा / मालमत्ता काही कामी येईल का अशा वेळी? त्यापाठी मन:शांती आणि आरोग्याची कितीहेळसांड करायची? जात/धर्म/भाषा ही बंधनं आपली सामुदायिक प्रतिकारशक्ती ( किंवा विषाणू ) बघत नसेल तर त्यापायी आपण तरी का आपलं आयुष्य तणावपूर्ण का करायचं? आनंदाने जगा व जगू द्या ना! आणि हो प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, निकोप आरोग्यसाठी प्रसन्न मनही हातभारच लावेल.
चला तर मग,समभाग थोडे फार सावरलेच आहेत. सर्वे सन्तु निरामय अशी प्रार्थना करून निरोप घेतो. क जीवनसत्वाची गुटी (लिंबू - पाणी) घेण्यासाठी बायको बोलावते आहे. साबणाने हात धुऊन गेलेलं बरं.
Comments
-Rajeshwari