'एखादा पुढे काय करणार?', हा सगळ्यात अवघड प्रश्न असावा असं मला वाटत होतं, पण आजपर्यंतच्या अनुभवावरून 'एखादा सध्या काय करतो?' हा त्याहीपेक्षा अवघड प्रश्न आहे असं माझं मत बनलं आहे. सगळेच प्रश्न हे सोडवण्यासाठी नसतात, तर काही काही प्रश्न हे फक्त उत्तर देण्यासाठी असतात. "तू. स. का. क.?" हा एक तसला प्रश्न आहे. उत्तरण्यासाठी "तू.पु.का.क.?" हा फार सोपा आहे.. सहसा तो लहान मुलांना विचारला जातो. आणि मी डॉक्टर होणार, इंजिनिअर होणार, वकील होणार, शिक्षक होणार, सैन्यात जावून देशाची सेवा करणार ह्यापैकी काहीही सांगितलं की विचारणा-याचं (काका, काकी, मावशी, मामा, पाहुणे, मास्तर किंवा तत्सम) तात्काळ समाधान होऊन ते गप्प बसतात. पण "तू स. का. क.?" हे प्रकरण मात्र तेवढं सरळ नाही. कारण तुम्ही काहीही उत्तर दिलं तर 'म्हणजे नक्की काय' आणि 'का?' ह्या दोन्हींतला एक उपप्रश्न तुमच्या वाट्याला येतोच येतो.. ह्याची सुरुवात मी अभियांत्रिकीला प्रवेश घेतल्यावर झाली.. 'तू सध्या काय करतो?' असं एका परिचितांनी विचारल्यावर मी अभिमानाने म्हटलं, 'मी सांगलीला...