'केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार' असं मी लहानपणापासून ऐकतो आहे.. पण माझ्या व्यवसायात चतुर माणसांनाच देशाटनाची संधी मिळत असल्याने आधी कोंबडी की आधी अंडे अशी गत होऊन, मी दोन्ही गोष्टींना बरेच दिवस पारखा होतो. शेवटी सत्राशे साठ भानगडी करून मी ऑनसाइटची संधी साधली़च. प्रेमात, युद्धात आणि धंद्यात सारं काही क्षम्य ;).. तर अमेरिकेत आल्यावर सगळ्यात जास्त प्राधान्य अर्थात फिरण्याला होतं. जास्त फिरणं = जास्त चातुर्य सरळ हिशोब. फिरण्यातही मी अशी गावं निवडली की जिकडे माझे (माझ्यासारखेच) चतुर मित्र-मैत्रिणी तळ ठोकून होते. वसंतागमानापर्यंत न्यू-यॉर्क/कनेक्टिकट अशा जवळपासच्या मित्रांना मित्रप्रेम दाखवून झाल्यावर मी मिड वेस्ट कडे मोर्चा वळवला. मे च्या मेमोरिअल डे च्या सुट्टीत शिकागो - ब्लूमिंग्टन - इंडी असा धावता दौरा आखला. ब्लूमिंग्टनमधे शिल्पा-मोहित ने नवीन घर घेतलं होतं, त्याच्या वास्तुशांतीच आग्रहाचं आमंत्रण असूनही मी जावू शकलो नव्हतो, त्यामुळे ती पार्टी वसूल करणं हा एक अंतस्थ हेतू होताच. शिकागो विमानतळावर सचिन, शिल्पा आणि मोहित मला घ्यायला येणार ह्या विचाराने मी निर्धास्त होतो, पण ...