Skip to main content

केल्याने देशाटन..

'केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार' असं मी लहानपणापासून ऐकतो आहे..
पण माझ्या व्यवसायात चतुर माणसांनाच देशाटनाची संधी मिळत असल्याने आधी कोंबडी की आधी अंडे अशी गत होऊन, मी दोन्ही गोष्टींना बरेच दिवस पारखा होतो. शेवटी सत्राशे साठ भानगडी करून मी ऑनसाइटची संधी साधली़च. प्रेमात, युद्धात आणि धंद्यात सारं काही क्षम्य ;)..
तर अमेरिकेत आल्यावर सगळ्यात जास्त प्राधान्य अर्थात फिरण्याला होतं. जास्त फिरणं = जास्त चातुर्य सरळ हिशोब. फिरण्यातही मी अशी गावं निवडली की जिकडे माझे (माझ्यासारखेच) चतुर मित्र-मैत्रिणी तळ ठोकून होते. वसंतागमानापर्यंत न्यू-यॉर्क/कनेक्टिकट अशा जवळपासच्या मित्रांना मित्रप्रेम दाखवून झाल्यावर मी मिड वेस्ट कडे मोर्चा वळवला. मे च्या मेमोरिअल डे च्या सुट्टीत शिकागो - ब्लूमिंग्टन - इंडी असा धावता दौरा आखला. ब्लूमिंग्टनमधे शिल्पा-मोहित ने नवीन घर घेतलं होतं, त्याच्या वास्तुशांतीच आग्रहाचं आमंत्रण असूनही मी जावू शकलो नव्हतो, त्यामुळे ती पार्टी वसूल करणं हा एक अंतस्थ हेतू होताच.

शिकागो विमानतळावर सचिन, शिल्पा आणि मोहित मला घ्यायला येणार ह्या विचाराने मी निर्धास्त होतो, पण इलिनॉयमधे असले तरी मंडळी मूळची पुण्याची होती. पाहुण्यांना एवढ्या सहज यजमान भेटावेत हे पुणेकरांना मान्य नाहीच. "अरे आम्हाला पोहचायला उशीर होतो आहे, तर शिकागो ऐवजी मिलवाकी विमानतळावर ये आम्ही तिथे नक्की घ्यायला येतोय" सचिनने परत एक नवी योजना समजावून सांगितली. नशीब म्हणजे शिकागो विमानळावरून मिलवाकी विमानतळावर विमानाने नव्हे लोकल ट्रेन ने जायचं होतं. चला म्हणजे इथल्या सब-वेचाही फेरफटका होणार तर.

How to go to the sub way? असं मी तिथल्या एका म्हाता-या दुकानदार काकूंना नम्रपणे विचारलं .. माझ्यावर आपादमस्तक नजर टाकून त्या म्हणाल्या, "सीधा जाव, और पहला राइट लेलो, सामनेही प्लेटफार्म दिखेगा" आणि त्या परत ग्राहक कडे वळल्या.. ह्या गुजराथी मिश्रित हिंदी directions ने मी चमकलोच..अजून काही वर्षांनी गुजराथी अमेरिकेची द्वितीय/तृतीय भाषा झाली नाही तरच नवल.. ह्या धक्क्यातून सावरत मी स्टेशन गाठलं तर अजून एक अडचण समोर उभी. इथली सगळी तिकिट विक्री यंत्रांवर होती आणि ती सगळी यंत्रे "मुकाट्याने तिकिटाचे नेमके पैसे द्या, सुट्टे मिळणार नाहीत" असा वैधानिक इशारा अभिमानाने मिरवत होती. जगातले सगळे कंडक्टर, तिकिट विक्रेते आणि ही यंत्रे ह्यांच्यात कमालीची एकी आहे. अखेर मी क्रेडिट कार्ड घासून अख्ख्या दिवसाचा पास विकत घेतला, कारण एकेरी प्रवासासाठी आज रोख, उद्या उधार असा मामला होता. तरी एक बरं, अजून २-३ स्टेशनं माझ्या मित्रवर्यांनी मला पळापळ करायला लावली, तर पासाचे सगळे पैसे वसूल होतील ;).. पण सुदैवाने ती वेळ आली नाही. मिलवाकी च्या सब-वे स्टेशनवर सगळे हजर होते..
उशीर होण्यामागे कारण होतं की हे सगळे वाटेत एका दक्षिण-भारतीय देवळात थांबले होते आणि तिथून इड्ली-वडे-सांबार असले पदार्थ नाश्त्यासाठी खरेदी करून आले होते.. (हे सगळे पदार्थ त्या देवळात प्रसाद म्हणून फुकट वाटत असावेत अशी जोरदार शंका मला येत होती, पण to be on safer side, नाश्ता होइपर्यंत ती विचारायची नाही असं मी ठरवलं)..

शिकागो मधे हवामान फारच छान होतं, स्वच्छ ऊन पडलं होतं आणि पहिला मुक्काम होता तो नेव्ही पिअर. लेक मिशिगन च्या बाजूला बसून नाश्ता करायची शिल्पाची कल्पना सही होती. इतक्या वर्षांनी मित्रांच्या भेटी झाल्यावर इडली-सांबरही गोड लागत होतं, ते एवढं जास्त गोड का लागतंय असा विचार करत असताना लक्षात आलं की त्यात ती मिठाई मिसळली गेली होती.;) पण राव सचिन , शिल्पा आणि मोहितला भेटूनच माझं पोट भरल होतं, त्यामुळे खाण्यापिण्याची कोणाला काळजी?

नेव्ही पिअरच्या आजूबाजूला थोडा फार फेरफटका मारला आणि मग लेक मिशिगन / मिशिगन नदीतल्या फेरफटक्याला आम्ही निघालो. प्रथेप्रमाणे जिकडे वाटेल तिकडे फोटो काढणं मध्यंतरीच्य काळात चलूच होतं. शिकागो शहर मिशिगन नदीच्या काठावर वसलेलं आहे.. आणि शिकागो डाऊन-टाऊन संपूर्णपणे त्या नदीतून व्यवस्थित दिसतं. त्यामुळे नदीची सफर हा सगळ्या पर्य़टकांचा सगळ्यात आवडता कार्य़क्रम आहे. तोंडाचा चंबू करून मी एक एक इमारत बघत होतो. त्यांची शान ही जागतिक महासत्ता असणा-या अमेरिकेला साजेशीच होती. गगनचुंबी हे एकमेव साम्य, बाकी प्रत्येकीचा रंग-ढंग वेगळा. ह्या सा-या इमारतींनी जे कोलाज बनलेलं आहे, ते शब्दांत तर नाहीच पण कॅमे-यात टिपणं देखील अशक्य होतं. आपापले वास्तु-सौंदर्याचा भार सांभाळत, थोडासा नखरेलपणा करत त्या नदीच्या काठी तो-यात उभ्या होत्या.. अधून मधून नदीच्या पाण्यात प्रतिबिंब न्याहळत आपण आपल्या सखी-शेजारणी पेक्षा कांकणभर सरसच दिसतो आहोत ना ह्यांची त्या खात्री करत असाव्यात असं मला वाटून गेलं. एका तासाभराची ती सफर इतक्या महिन्यांनंतरही मनात अजून ठसलेली आहे.
पण गंमत म्हणजे, हे भव्य दिव्य शहर अमेरिकेची चोरांची आळंदी आहे. It's the No. 1 Crime city of USA.
आणि त्या काळ्या पैशाचा ह्या मोठ्या इमारती उभारण्यामागे फार मोठा हातभार आहे.

परत आल्यावर असांच टाइमपास करत डाऊन टाऊन मधे पायी पायीच मिलेनिअम पार्क कडे निघालो.. शिकागो मधे पर्यटकांसाठी फुकट बसेस आहेत. खरं तर आम्ही अशाच बस ने जायचा प्रयत्न केला होता, पण तो काही यशस्वी झाला नाही. मिलेनिअम पार्क देखील छान आहे आणि त्यात मुख्य आकर्षण आहे ते 'The Bean'. भली-मोठी चवळीच्या आकाराची ती स्टीलची वास्तुकृती अशा खुबीने ठेवली आहे की कुठूनही पाहिलं तरी त्यात अख्खं डाऊन टाऊन दिसतं. आणि त्या बीन ची संकल्पना - रचना एका अनिवासी भारतीयाचीच आहे..

त्यानंतर मग लेट लंच किंवा अर्ली डिनर करत आम्ही पोटाला काम आणि पायाला आराम दिला.. ताजंतवानं होवून मग परत शिकागो भ्रमंती सुरु झाली. वाटेत 'स्वामी विवेकानंद मार्ग' लागला, स्वामी विवेकानंदांनी जेथे त्यांचे सर्वधर्म-परिषदेतले ऐतिहासिक भाषण केले, त्या सभागृहाच्या समोरच्या रस्त्याला स्वामी विवेकानंदांचे नाव दिलेले आहे. अजून थोडं दमल्यावर चीझ-केक फॅक्टरीत पेस्ट्री खाणं झालं.. तसा खाण्या-पिण्याच्या बाबतीत मात्र माझा पाहुणचार अगदी व्यवस्थित चालू होता.

शिकागो मधे सगळ्यात मोठी इमारत आहे ती 'सिअर्स टॉवर' आणि त्या खालोखाल 'हॅनकॉक टॉवर'.हॅन्कॉक टॉवरवरून लेक मिशिगन आणि शिकागो बघायचं ठरलं, पण त्यांच्या ऑब्सर्व्हटरीवर जायला मोठीच रांग होती (आणि २०$ पण). मग त्या ऑब्सर्व्हटरीच्या खालच्या मजल्यावर (बहुतेक ९९ व्या) एक रेस्टॉरंट आहे. तिकडे कॉफी प्यायच्या बहाण्याने गेलो. त्या रेस्टॉरंट मधून झगमगणारं शिकागो आणि मॅगनिफिसन्ट माइल पाहिला. कॉफी न पिताच कलटी मारली. मला मनात थोडी धाकधूक होती, की त्यांचे द्वारपाल पकडून कॉफी घ्यायलाच लावतील. पण बाकी सगळे एकदम बिनधास्त होते. बहुतेक ही ट्रीक ब-याचदा वापरून चांगलेच सराइत झाले होते.



तिथून मग पार्किंगमधून मोहितने गाडी काढली. आणि ब्लूमिंग्टनला निघालो. वाटेत कारंज्याजवळ थोडं थांबलो, पण त्याच्या रोषणाईची वेळ संपली होती. ह्या कारंज्यातूनही फार उंच उंच पाणी उडवतात, सकाळी ते बघितलं होतंच, पण रात्री त्याच्या वर रंगीत प्रकाशझोत मारल्यावर ते वेगळचं दिसतं.



रात्री सचिनकडे मुक्काम केला. इतक्या वर्षांच्या साठलेल्या गप्पा मारता मारता पहाटे कधी तरी डोळा लागला.

सकाळी सगळं आवरून पियालीच्या घरी चहा-पाणी केलं. ब्लूमिंग्टन दर्शन १५ मिनिटात आटपून (गावच केवढसं) शिल्पा-मोहितच्या घरी जेवायला गेलो. पोटभर मासे आणि गप्पा झाल्या. पुणे-पटनीतली मजा आठवून सॉलीड हसलो. लोकांच्या पाठीमागे त्यांची निंदा करायची, सचिन व शिल्पाची (This is debatable, ते म्हणतील अमितची) हौस भागवली. :D .



इथून पाय निघत नव्हता, पण सचिन मला १०० मैलांवर सोडणार होता आणि इंडियानावरून अमित आणि स्वप्ना मला न्यायला येणार होते.

Comments

Popular posts from this blog

मे महिना

शाळेत असताना माझा सगळ्यात आवडता महिना होता तो मे महिना! कारणं तर सगळ्यांनाच माहिती आहेत. निकाल लागलेला असल्याने पुढच्या वर्गात जाण्याची खात्री असायची, घरात सगळे नातेवाईक, पाहुणे असल्याने खेळायला/उनाडक्या करायला अख्खी टोळी असायची, त्यावेळी तरी पुढच्या वर्गांच्या शिकवण्या/संस्कार वर्ग/उन्हाळी शिबिरं असले काही प्रकार नव्हते आणि ह्या सगळ्याला असायची ती कोकणाची पार्श्वभूमी. आंबे, फणस, काजू, जांभळं, करवंद ह्यांचा रतीब, गाज ऐकत वेळेवर फिरणं, किल्ले बांधणं, शंख-शिंपले गोळा करणं, उकाड्याने हैराण झालो की एखादे काका/मामा आइस्क्रीम खायला देतील ह्या आशेवर राहणं, वळवाच्या पावसात चिंब होणं हे सगळं मनोसोक्त भोगायचे ते दिवस होते. इतक्या वर्षांनंतर परत मे महिन्यात कोकणात जायची संधी मिळाली. मारामारी करून कोड अप्रूव्ह करून घेतला आणि सरळ गोवा गाडी पकडून कणकवली गाठली. तसंही महिन्यातून एकदा जाणं होतंच, पण ते २, जास्तीत जास्त ३ दिवस. ह्या वेळी अख्खा आठवडा हातात होता. २ दिवस सिंधु-महोत्सव बघत आराम केला. कार्यक्रम/आयोजन चांगलं होतं पण मागच्याच आठवड्यात नाट्यमहोत्सवाची धमाल केलेल्या नाट्यवेड्या (नाट्यरसिक नव्हे)...

मुक्काम पोस्ट बोस्टन..

If you can not see the MARATHI text below, then please use following links Part I Part II काल दुपारी (नेहमीप्रमाणे) काम नसल्याने खिडकीतून बाहेर बघत होतो..आभाळ कसं अगदी भरून आलेलं आणि सोसाट्याचा वाराही सुट्लेला.. क्षणभर वाटलं की मस्तपैकी टपरीवर जावून कटिंग चहा मारावा.. अशा वातावरणात चहाची तल्लफ येण्यात चूक काहीच नाही.. फक्त त्यासाठी कुठेतरी भारतात असायला हवा होतो.. :( बघता बघता बोस्टनमधे येवून तीन महिने होत आले.. पण खरं पाहू जाता फार दूर आलोयं असं वाटतं नाही.. आणि तसं वाटण्यासारखी परिस्थिती पण नाही.. मागच्याच शनिवारी माझा एक मित्र कणकवलीहून आला, येताना माझ्या आईने दिलेले बेसनचे लाडू घेवून आला.. लगेचच मी घरी फोन करून ते मिळाले म्हणून कळवलं.. आणि आईने पण नेहमीप्रमाणे, 'कसे झालेत?, सगळ्या मित्रांना दे' असं सांगितलं.. जणू काही मी सांगलीत हॉस्टेलमधेच होतो.. आणि ह्या शनिवारी तर न्यू इंग्लड होळी पण साजरी झाली. पुण्यातून कूल कॅब ने मंदारकडे निघालो तेव्हा जरा धाकधूक होती, टॅक्सीवाला रात्री ११ वाजता मुंबईत पोहचल्यावर उगीचच इकडे तिकडे फिरवून जास्त भाडं तर नाही ना मागणारं?, पण दिवसा ढवळ्या ...

मार्गे दलाल पथ...

पैसा पैशाला ओढतो, असं ऐकून एक गरीब माणूस मंदिरात गेला, हातातला एक रुपया दानपेटीवर धरून वाट बघू लागला, आपण २-३ रुपये ओढले तरी काही कमी फायदा नाही असा त्याचा हिशोब होता. पाच एक मिनिटांतच त्याच्या हातातून तो रुपया सुटला आणि दानपेटीत गेला.. ते पाहून तो उद्गारला, "अरेच्च्या! पैसा पैशाला ओढतो हे खरं आहे.. पण कोणाचा पैसा कोणाच्या पैशाला ओढेल हे मात्र सांगता नाही येणार" लहानपणी ऐकलेल्या ह्या गोष्टीचा अर्थ मला शेअर-बाजारात नव्याने समजला... मी माझा पैसा घेऊन दुस-यांचा पैसा ओढायला जायचो, आणि दुसरेच माझा पैसा ओढत. मग कोणीतरी म्हणालं, 'अरे वेड्या, असं नसतं कधी. पैसा म्युच्युअल फंड मद्धे टाकावा, सगळ्यांचा पैसा एकत्र येतो आणि मग win-win situation होते, सगळेच जण पैसा कमावतात.' Makes sense :D.. पैसा म्युच्युअल फंड मद्धे टाकला.. सगळयांचा पैसा एकत्र आला, पण दुर्दैवाने दुस-या MF ने फायदा कमवला, आमचा सगळ्यांचा पैसा त्यांनी ओढला, दुस-या MF वाल्या सगळ्यांनीच पैसा कमावला.. त्यांच्यासाठी खरच win-win situation झाली. Think Contra.. अशीही एक शेअर-बाजाराची Strategy आहे.. म्हणजे काय तर तुम्हाला एख...