Skip to main content
गणपती बाप्पा मोरया 

"हा रामेश्वर, म्हणजे शंकर, त्याचं मंदिर पूर्व-पश्चिम आहे. आणि हे विष्णूचं मंदिर माञ उत्तर-दक्षिण , म्हणजे त्याला आडवं आहे. इतकंच कशाला, विष्णू पण आडवा पहुडलेला आहे. हा काही योगायोग नाही.  ह्या मागे पण पूर्वजांनी फार विचार केला आहे. भोळ्या शंकरावर तो लक्ष ठेवून आहे. एखाद्या राक्षसाने काही वर मिळवला, की त्याला आडवं जाण्याचं काम त्याला करावं लागतं.", देवळातले गुरव पुराणातल्या गोष्टीचा असा रंगतदार खुलासा करत होते, पण माझं लक्ष सृष्टीदेवतेकडेच होतं. 

गणपतीच्या दिवसांत तसंही  अवघ कोकण हिरव्या रंगात माखून जातं आणि त्यात आकेरीच्या  श्री रामेश्वर देवस्थानाचा परिसर तर खासच नटला होता.  




 नजर जाईल तिकडे पसरलेले गुढघाभर उंचीचे भाताचे हिरवेकंच तरवे, त्यांतून अखंड वाहणाऱ्या वहाळाचा खळखळाट ह्यांनी डोळे आणि कान तृप्त होतच होते, पण नुकत्याच पडून गेलेल्या सरीनंतर हवेत मस्त गारवा आला होता आणि अंगाशी खेळणाऱ्या वाऱ्याच्या झुळकी त्याची मजा अजूनच वाढवत होत्या. सूर्यदेवही इकडे तिकडे फिरणाऱ्या ढगांमागे आळसावला होता. 
एकूणच गणपती बाप्पाला पृथ्वीवरच्या वास्तव्यात त्याच्या स्वर्गातल्या घराची उणीव न भासावी असं काहीसं वातावरण होतं. 



आणि लाखो चाकरमान्यांसारखा मी एक, हे सुख शक्य तेवढे ओरपून घेत होतो. 


काही झाले तरी हा गौरी - गणपतीचा सण म्हणजे वर्षभराचं री-चार्जिंगच ना! पण मंडळी, फक्त पर्यटन हाच एक हेतू नाही हां ! 

"हरी भजनाची आवड मोठी, धावत आलो उसळीसाठी" असं कोकणी माणूस आपल्या तिरकसपणाने  म्हणेलही, पण भजनातं माञ देह-भान हरवून रंगून जाईल. तिथे 'आधी पोटोबा मग विठोबा 'असा प्रकार नाही. श्री  देव  ..... तमुक-तमुक ......  प्रासादिक भजनी मंडळ प्रत्येक वाडीत एक (आणि एकच ) असतं. पायपेटी, तबला डग्गा, दहा-बारा टाळकरी, एक झान्ज एवढा सरंजाम जोडीला असला की बुवांच्या अंगात पं भीमसेन जोशी संचारलेच. नमन ,अभंग, गवळ, गजर अश्या वेगवेगळ्या भक्ती गीतांचे प्रकार तर ऐकायला मिळतातच, पण सिने गीतांच्या चाली वरची गाणीही वर्ज्य नाहीत. रात्रीचे जेवण झाले की आधी ठरवलेल्या क्रमाने एका एका घरी जाऊन तास दीड तास भजनाचा कार्यक्र्म चालतो. मग चहा आणि उसळ/पोहे/करंज्यांनी श्रमपरिहार.  
उसळीचे पातेलं 

एका दिवशी (म्हणजे रात्री) ४-५ घरं घेऊन सात दिवसांत सगळी वाडी पूर्ण करायची. पहाटे ४-५ वाजेपर्यंत जागताना कोणाचा उत्साह तसूभरही कमी होत नाही. गावकरी/चाकरमानी ६-७ वर्षाच्या मुलांपासून सत्तरीच्या आजोबांपर्यंत सारे अगदी तल्लीन होऊन जातात.
फुगडी हा बायकांचा प्रांत असला तरी मुलीही आजकाल भजनात दिसतात. 

खरं तर समस्त भारतीय नारींप्रमाणे ह्या सणातही  बायकांचीच मेहनत मोठी! साफसफाई, प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ, पूजेची तयारी ह्या सगळ्यातून आरती-भजनांना वेळ नाही मिळाला तर त्यात नवल ते काय? शिवाय येणारे/जाणारे, लहान मुलांचे कोड-कौतुक हे आलंच. लपंडाव खेळांना-या लहरी पावसावर मात करून कपडे  सुकवणे हाच एक मोठा प्रोजेक्ट असतो. तरीही गणराया पुढे दोन घटका हात जोडताना भक्तीचा पूर कुठेही कमी नाही. त्यांच्या कामामुळेच सगळ्या पुरुषांना रात्रभर भजन करून दिवसा जागरण निवळणं  शक्य होतं. पारंपरिक पदार्थ तर ठरलेले असतातच. पहिल्या दिवशी मोदक, मग दुसऱ्या दिवशी उंदीर मामांना खीर, शिरवाळे आणि नारळाचं दूध, करंज्या, उसळी, रान भाज्या ...... नाना तऱ्हा. रांगोळी घातलेल्या पंक्तीत, मग केळीच्या पानाला पण तृप्त झाल्यासारखं वाटून जातं, तेव्हा जीव आटवलेल्या बायकांना एक वेगळंच समाधान मिळत. गौर पुजताना मग त्यांची गाणी आणि फुगड्या होतातच. 

लाडक्या बाप्पासाठी खाण्याची आणि गाण्याची अशी तयारी असताना, सजावटीचीही मोठी धांदल उडते. शक्य असेल तर सगळ्याच घराला रंगाचा एक हात बसतो. पूर्वी गणपतीमागच्या भिंतीवर नक्षीकाम रंगवणे हेही गणपती रंगविण्याएवढेच महत्त्वाचे होते. आता रंगीत कागदांनी आणि चकाचक कापडाने ते काम फार सोपे केले आहे.  
वळयेत पताका,  फुलांची  तोरणे,  दिव्यांची आरास आणि लाईट इफेक्टही जो तो यथा शक्ती करतो. 
शहरातल्या एखाद्या मंडळातल्या कार्यकर्त्यांपेक्षा घरातल्या मंडळीची संख्या जास्त असल्यावर त्याचा उत्साह काय वर्णवा? खास फोटो देऊन गणपती बनवून घेतला जातो. साधा शेल्याचा रंग मनासारखा नाही झाला तरी नाराज होणाऱ्या गिऱ्हाईकांना सांभाळताना मूर्तीकारांचे हाल होतात. आणि एकाचा गणपती दुसऱ्या कोणी कॉपी केला तर मग काय विचारायलाच नको. सजावटीचं कामही अगदी दुसऱ्या / तिसऱ्या दिवसापर्यंत चालले तरी हरकत नाही, पण काम चोख हवे.

ह्या धामधुमीत ७ दिवस कसेच  जातात. गणपतींची जायची वेळ येते तेव्हा हातात तांदूळ घेऊन उभ्या असलेल्या कुटुंबाच्या वतीने वडीलधारे गाऱ्हाणं घालतात - "बा देवा म्हाराजा, सालाबादप्रमाणे जी काय वेडी वाकडी सेवा केली हा ती मान्य करून घे.  जर काय चुकला आसात तर लेकरांका माफ कर आणि तुझी कृपाद्रीष्टी सगळ्यांवर अशीच रवांदे." "होय म्हाराजा" असं म्हणतां मग आवाज कातरतो आणि बाप्पांचा निरोप घ्यायच्या विचाराने जीव व्याकुळतो. 

मोक्ष मिळो न मिळो, पण हे अप्रतिम निसर्ग सौन्दर्य, भक्तीमय वातावरण, चविष्ट पदार्थांची रेलचेल, आप्तेष्टांचा सहवास हे सारं असंच जन्मोजन्मी  मिळत राहो हीच बाप्पाचरणी प्रार्थना!

Comments

Free flowing and lively, your blog and the lovely Konkan... Well scripted
Yogesh said…
डोळ्यासमोर हुबेहूब वातावरण उभे राहिले. असेच लिहीणे चालू ठेवा.
खूपच सुंदर, तळकोकणाचं हुबेहुब वर्णन!
Distant.soul said…
खूप छान वर्णन केलंय अमित दादा ��
Unknown said…
खूप सुंदर दादा

Popular posts from this blog

मुक्काम पोस्ट बोस्टन..

If you can not see the MARATHI text below, then please use following links Part I Part II काल दुपारी (नेहमीप्रमाणे) काम नसल्याने खिडकीतून बाहेर बघत होतो..आभाळ कसं अगदी भरून आलेलं आणि सोसाट्याचा वाराही सुट्लेला.. क्षणभर वाटलं की मस्तपैकी टपरीवर जावून कटिंग चहा मारावा.. अशा वातावरणात चहाची तल्लफ येण्यात चूक काहीच नाही.. फक्त त्यासाठी कुठेतरी भारतात असायला हवा होतो.. :( बघता बघता बोस्टनमधे येवून तीन महिने होत आले.. पण खरं पाहू जाता फार दूर आलोयं असं वाटतं नाही.. आणि तसं वाटण्यासारखी परिस्थिती पण नाही.. मागच्याच शनिवारी माझा एक मित्र कणकवलीहून आला, येताना माझ्या आईने दिलेले बेसनचे लाडू घेवून आला.. लगेचच मी घरी फोन करून ते मिळाले म्हणून कळवलं.. आणि आईने पण नेहमीप्रमाणे, 'कसे झालेत?, सगळ्या मित्रांना दे' असं सांगितलं.. जणू काही मी सांगलीत हॉस्टेलमधेच होतो.. आणि ह्या शनिवारी तर न्यू इंग्लड होळी पण साजरी झाली. पुण्यातून कूल कॅब ने मंदारकडे निघालो तेव्हा जरा धाकधूक होती, टॅक्सीवाला रात्री ११ वाजता मुंबईत पोहचल्यावर उगीचच इकडे तिकडे फिरवून जास्त भाडं तर नाही ना मागणारं?, पण दिवसा ढवळ्या

.... अवघे धरू सुपंथ

सकाळचे साडे नऊ , धडाम! ८५५५, निफ्टी खालच्या वाटोळ्याला (सर्किट) निपचित पडला. अपशकुनी १३ तारखेचा शुक्रवार वाकुल्या दाखवत होता. पोर्टफोलिओ बघण्याची ना हिम्मत नव्हती आणि ना उपयोग.  त्याहीपेक्षा भांडवली बाजाराच्या विरोधकांमधील सर्वकालीन अग्रणींपैकी एक असलेल्या सौभाग्यवतींना काय तोंड द्यायचं ह्याचा विचार करून मेंदूचा भुगा होता.धीर करून तिच्या भरवशाच्या सोन्याचा दर बघितले , ते पण पडलेले ... जरा हायसं वाटलं. निदान - "तरी मी सांगत होते , शेअर्स वर पैसे लावण्यापेक्षा सोनं घे" हे ऐकून घ्यावं लागणार नाही. करोना विषाणू लागण झालेली लोकं कमी आणि गुंतवणूकदार जास्त मारणार हे खरं ठरणार बहुतेक.  पण तसाही सगळीकडे अक्षरश: हाहाकार माजला आहे. २१ व्या शतकात शहरं विलगित केली जातात हा धक्का पचण्याआधीच प्रांताच्या विलगीकरणाची आणि त्या मागोमाग देशांच्या सीमा बंद झाल्याच्या बातम्या धडकल्या. अगदीच अकल्पित घडलं. गुंतवणूकदारांचं सोडाच, पण सगळे उद्योगधंदे ठप्प झाले आहेत.प्रवास, बाजारपेठा, चित्रपटगृहे, शाळा, महाविद्यालये ह्यांच्या बंदीमुळे आर्थिक चक्र थांबलं आहे. ऑलम्पिक सुद्धा रद्द करण्याची पाळी आली

माझी वाचनकथा

शशांकने खो दिल्यावर मी खरतर लगेचच पळायला पाहिजे होतं, पण आळस हा माणसाचा शत्रू आहे, शत्रूवरही प्रेम करा इत्यादी वाचलेल्या अनेक सुविचारांचा एकत्रित परिणाम झाल्याने आज मुहूर्त सापडला.. सर्वप्रथम ह्या सगळ्या प्रकाराबद्दल माझ्या मनात थोडी शंकाच आहे.. "तू जर ब्लॉग लिहितोस आणि स्वत:ला मराठी साहित्याचे उपासक समजतोस, तर मग सांग बघू काय काय वाचलय ते?" असं करणं म्हणजे "पोहता येत, तर मग जरा पाण्यात उडी मारून दाखव" ह्या धर्तीवर खिंडीत पकडणे होय. जर हा हेतू असेल तर मी तात्विक निषेध नोंदवतो आणि इथेच लिखाण थांबवतो, ;) ...अथवा पुढे वाचा (माफ करा पण आज्ञावल्या लिहून/वाचून if, else लिहायची सवय लागली आहे). वाचन हा सगळ्यात आवडता छंद. आणि लहानपणापासून मी हाती लागेल ते पुस्तक वाचायचो, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके दिवाळी अंक, कॉमिक्स, हे तर होतंच, पण सगळ्यात आवडीच्या पुस्तकांपैकी होती ती बालभारती, कुमारभारती. त्यांतले धडे फारच सुंदर होते, अर्थात परीक्षा नावाच्या एका राक्षसाने त्यातला आनंद अर्धा केला. संदर्भासह स्पष्टीकरण, कवितेचे रसग्रहण, भाषावैशिष्ट्ये असले प्रकार म्हणजे मला साहित्या